नव्या विमानतळ टर्मिनलचे उदघाटन न झाल्यास आंदोलन; मोहन जोशी यांचा इशारा
By अजित घस्ते | Published: December 22, 2023 03:53 PM2023-12-22T15:53:09+5:302023-12-22T15:54:15+5:30
वाढत्या प्रवासी संख्येमुळे गैरसोय होवू नये यासाठी लवकरच नवे टर्मिनल सुरू करावे अशी मागणी जोर धरत आहे
पुणे : विमान प्रवाशांच्या सोयीसाठी लोहगाव पुणे विमानतळ येथे नवे टर्मिनल उभा करून ४ महिने झाले. मात्र अध्याप कार्यान्वित झाले नाही.त्यामुळे विमान प्रवाशांची वाढती संख्या पाहता ते लवकर कार्यान्वित गरजेचे आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने उदघाटनासाठी नव्या टर्मिनलची प्रतिक्षा करावी लागत आहे. हा प्रकार पुणेकरांसाठी संतापजनक असून १ जानेवारी पर्यत हे उदघाटन व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
विमान प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने पुणे विमानतळावर अनेक गैरसोयी वाढू लागल्या. विमानाचे लॅन्डिंग करण्यातही अडथळे येत आहेत. विमान प्रवाशांची संख्या वर्षाकाठी ७० लाख होती, ती ९०लाखांपर्यंत जावून पोहोचलेली आहे. ती लवकरच १ कोटीचा आकडा ओलांडेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या प्रवासी संख्येमुळे गैरसोय होवू नये यासाठी लवकरच नवे टर्मिनल सुरू करावे अशी मागणी जोर धरत आहे.
करोडो रुपये खर्चून नवे टर्मिनल उभारण्यात आले. ऑगस्ट २०२३ पूर्वीच नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले, चाचण्याही झाल्या. टर्मिनल ताबडतोब कार्यान्वित व्हावे यासाठी विमान प्रवाशांनी सोशल मिडियाद्वारे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर पोर्ट ॲथॉरिटीचे लक्ष वेधले. त्याला दाद देण्यात आली नाही, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन व्हावे, यासाठी त्यांच्या कार्यालयाला पत्रही लिहीले. मात्र, पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात मोदींना वेळ मिळाला नाही. नवे टर्मिनल चालू व्हावे यासाठी प्रवासी आतुर झाले आहेत. विमानतळाची प्रवासी क्षमता वाढणार आहे, विमानांची संख्या वाढणार आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांना कामाचे श्रेय घेऊन मिरवायचे आहे. याकरिता भाजपच्या नेत्यांकडून वेळकाढूपणा चालू आहेत. हे डावपेच निंदनीय आहेत असा आरोप असे मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.