धनकवडी: आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय असो, आघाडी सरकारचा धिक्कार असो... अशा घोषणा करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुण्यातील कात्रज चौकात आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवल्याचे चित्र दिसून आले. काही जण आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याच्या नादात मास्क घालणे विसरले होते.
ओबीसी आरक्षणा साठी भाजपने एल्गार पुकारलेला असतानाच आता रासपही ओबीसीं आरक्षणासाठी मैदानात उतरला असून रासप नेते महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुरु होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आरक्षणाची बाजू मांडली. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊन देणार नाही असा इशारा देत भविष्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान, २६ जून रोजी भाजपने ओबीसी आरक्षणासाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं होतं. ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारमुळे गेलं. सरकारचा नाकर्तेपणा आता जनतेसमोर आलाय. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे. असे आंदोलनकर्ते म्हणाले.