पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात मागील काही दिवसात ड्रग्ज संदर्भात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. ललित पाटील या ड्रग्ज तस्करामुळे शहरातील ड्रग्जची समस्या ऐरणीवर आली होती. त्यामुळे एकूणच सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातच गांजा सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्याबाबत आता विविध संघटनांकडून कारवाईची मागणी पुढे येत होती. अशातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठात आंदोलन केले आहे. यावेळी ABVP चे विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
व्यसनमुक्त विद्यापीठ झालंच पाहिजे, व्यसनमुक्त विद्यापीठ झालंच पाहिजे, भारत माता कि जय अशी घोषणाबाजी करत विद्यार्थी आक्रमक झाले. यावेळी पोलीस आणि abvp च्या विद्यार्थ्यांमध्ये झटापट पाहायला मिळाली. आंदोलकांनी झेंडे घेऊन घोषणाबाजी करत प्रवेशद्वारावर आंदोलन केले. त्यानंतर खाली बसून घोषणाबाजीही त्यांनी केली. जोपर्यंत विद्यापीठ कारवाई करत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी यावेळी घेतला होता. विद्यापीठ प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.
काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ८ मध्ये सुमारे ७५० ग्रॅम गांजा सापडला होता. विद्यापीठ प्रशासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासन हे प्रकरण दडपत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटना करत असून कारवाईची मागणी केली होती. ही घटना १४ मे रोजी उघडकीस आली. एवढा गंभीर प्रकार घडूनही पुणे विद्यापीठ प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले होते. या घटनेला १० दिवस लोटल्यानंतरही काहीच ठोस कृती विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली नाही. केवळ या प्रकरणावर चौकशी समिती नेमण्यात येईल असे सांगण्यात आले होते.