पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका भाषणाविरोधात ब्राह्मण महासंघाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे व त्यांचे सहकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. दोघांमध्ये झटापट झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दवे म्हणाले, अमोल मिटकरी हे मूर्ख असून ते ब्राह्मण समाजाविरोधात बोलले आहेत असे आम्ही म्हणतच नाही. पण त्यांनी हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीने वापरला यावर आम्ही आक्षेप घेतला आहे. मी माझी बायको पुरोहिताला देत आहे असं त्यांनी म्हटलं होत. हे चुकीचं आहे. नमाजविरोधात मिटकरी असं बोलतील का? असा सवाल दवे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी हिंदु धर्माचं त्यांनी विडंबन केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध आंदोलन केले आहे. असा कुठलाही मंत्र लग्नांमध्ये बोललाच जात नसल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते अमोल मिटकरी
''आम्हा बहुजनाच्या पोरांना काही समजू देत नाही, एका लग्नात गेलो होतो तिथे नवरदेव पीएचडी आणि नवरी एमए झालेली होती. यावेळी ब्राह्मणाने एक मंत्र म्हटला ज्याचा अर्थ मी त्या नवरदेवाच्या कानात सांगितला की, महाराज म्हणताय माझी पत्नी घेऊन जा.''
मिटकरींचा खुलासा
मी तिथं एका गावातील कन्यादानाच्या प्रसंगाचं उदाहरण देऊन मंत्रोच्चाराचा उल्लेख केला. यामध्ये कोणालाही त्रास होण्याचं कारण नाही. त्यामुळं भाषणाचा विपर्यास करुन वेगळ्या पद्धतीनं वळण देण्याचं कटकारस्थानं केलं जात आहे. माझं भाषण जर पूर्ण ऐकलं असेल तर त्यामध्ये कुठल्याही समाजाचा उल्लेख केलेला नाही. मी कोणाबद्दलही अपशब्द बोललेलो नाही.