पुणे : जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहरात पाणीकपात करण्याचा आदेश दिल्यामुळे सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याच्या उद्देशाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेपुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर पाणी भरण्याच्या रिकामी कळशी घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यासह काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहराचे पाणी जवळपास अर्ध्यावर आणण्याचा आदेश जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी दिला होता.या आदेशामुळे भाजपवर विरोधक तुटून पडले आहेत. दुसरीकडे प्रत्यक्षात पाणीकपात सुरु केली नसतानाही शहरातील अनेक भागात पाण्याची समस्या जाणवत आहे. कसबा पेठ, शनिवार पेठ भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्यामुळे सध्या शहरात अनियमित पाणीपुरवठा असताना त्यातच भविष्यात पाणीकपातीची टांगती तलवार अशी स्थिती उद्भवल्यामुळे टिळक पुतळ्यापाठोपाठ महापालिकेतही आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या कारभारावर टीका करण्यात आली. आंदोलनप्रसंगी 'पुण्याचा चौकीदार पाणीचोर' अशा घोषणा देण्यात आल्या.