पुणे : ऊसाला एफआरपी मिळावी या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुण्यातील अलका चाैकापासून ते साखर संकुल पर्यंत पायी माेर्चा काढण्यात आला. यावेळी याेगेंद्र यादव यांच्यासाेबतच हजाराे शेतकरी सहभागी झाले हाेते.
शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यांना विकल्यानंतरही अनेक कारखान्यांकडून त्यांना अद्याप एफआरपीचा एक रुपया सुद्धा मिळाला नाही, असा आराेप यावेळी करण्यात आला. एफआरपी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखाे रुपये कारखान्यांमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ऊसाची एफआरपी मिळावी अशी मागणी या माेर्चाच्या वतीने करण्यात आली. दुपारी 1.30 च्या सुमारास या माेर्चाला सुरुवात झाली. हजाराे शेतकरी अलका चाैकात जमा झाले हाेते. खासदार राजू शेट्टी आल्यानंतर त्यांनी नागरिकांना कुठलाही त्रास हाेणार नाही याची काळजी घेत माेर्चा काढण्याचे आवाहन केले. फर्ग्युसन रस्ता मार्गे माेर्चा साखर संकुलकडे गेला.
Video : पुण्यामध्ये एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा
शेतकऱ्यांना संबाेधताना शेट्टी म्हणाले, आपल्या मागण्यांचा घाेषणा देत आपण माेर्चा काढणार आहाेत. आपलं भांडण सरकार आणि कारखनदारांशी आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना त्रास हाेणार नाही याची काळजी घ्या. शहरातील लाेकांची सहानभुती आपल्या माेर्चाला आहे. साखर संकुल येथे गेल्यानंतर साखर आयुक्तांशी आपण चर्चा करणार आहाेत. ते काय भूमिका घेतात त्यावर आपण आपली पुढची भूमिका ठरवू.