पुणे : उन्हाची वाढती तीव्रता आणि पुण्यासह आजूबाजूच्या भागातील तापमानाचा वाढता पारा यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अग्निशमन विषयी जागरुकता आणि पुरुषांच्या प्रशिक्षणावर भर देण्यासाठी तसेच लष्करी आणि नागरी यासह सर्व संयुक्त यंत्रणांच्या क्षमतांचा वापर करण्यासाठी, ‘अग्नी दमन-२३’ अग्निशमन सराव २९ फील्ड अॅम्युनिशन डेपो, देहू रोड येथे शुक्रवारी दक्षिण कमांड मुख्यालयाच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), एमसी आळंदी, अग्निशमन विभाग पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आकुर्डी, एमआयडीसी आंबी तळेगाव, एमसी तळेगाव दाभाडे, नगर परिषद चाकण, मुख्य अग्निशमन विभाग भवानी पेठ, टाटा मोटर्स लि., महिंद्रा व्हेईकल लिमिटेड आणि बजाज ऑटो यासारख्या ३२ नागरी यंत्रणांसह एकूण ५६ अग्निशमन यंत्रणांनी या सरावात सक्रिय सहभाग घेतला. सर्व प्रकारच्या आगीविरूद्ध जलद प्रतिसाद धोरणांसह प्रात्यक्षिके आणि कार्यपद्धतींची एकत्र पद्धतीने तालीम करण्यात आली.
हा सराव म्हणजे पुण्यातील लष्करी आणि नागरी आस्थापनेसह उपलब्ध सर्व अग्निशमन संसाधने एकत्रित करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न होता. यामुळे नागरिकांचे जीव आणि संपत्ती वाचवण्यासाठी बाधित भागात कमीतकमी शक्य वेळेत जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रेरणा मिळाली.