पुणे : भारतीय परंपरेतील ‘अग्निहोत्र’वर आधारित प्रयोगाला पेटंट मिळाले असून, ते मिळविण्यात राष्ट्रीय रासायनिक संस्थेचे (एनसीएल) निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांना यश आले आहे. त्यांच्यासोबत एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे, डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रणय दिलीप अभंग यांनी प्रयत्न केले. या तिघांनी अग्निहोत्र विधीचा अभ्यास केला आणि अग्निहोत्रातून निघणाऱ्या धुराचा हवेवर होणारा परिणाम, अग्निहोत्र राखेचे औषधी गुणधर्म, त्याने होणारे पाणी शुध्दीकरण, याचे प्रयोगशाळांमध्ये केले होते.
अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेत अतिशय सोपा यज्ञ आहे. अग्निहोत्रसाठी गायीचे तूप, हातसडीचा तांदूळ, गायीच्या शेणाच्या गोवऱ्या आणि तांब्याचा पत्रा लागतो. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावर, कार्यालयात अगदी १० मिनिटांत करता येतो. अग्निहोत्रासाठी सूर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळा उपयुक्त आहेत.
मोघे म्हणाले,‘‘ अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या जवळजवळ ९० % सूक्ष्मजंतूची वाढ थांबत असल्याचे सिद्ध झाले. प्रयोगासाठी निवडलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तेथे हवेचे प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले. पण अग्निहोत्र केल्यावर हवेतील घातक सल्फर डाय-ऑक्साईडचे प्रमाण दहा पटीने कमी झाल्याचे आढळले. त्यावरून प्रदूषण रोखण्यास अग्निहोत्र मदत करत असल्याचे सिद्ध झाले. रोपांच्या वाढीवर अग्निहोत्राचे परिणाम तपासण्यासाठी मोड आलेल्या बिया अग्निहोत्र खोलीत व शाळेच्या बाहेर परिसरात ठेवल्या. इतर परिसरातील बियांपेक्षा अग्निहोत्र वातावरण राख लावून ठेवलेल्या बिया रोपांची वाढ अग्निहोत्र वातावरणात जोमाने होते हे आढळले. ह्यामुळे शेतीला अग्निहोत्र विधी अत्यंत उपयुक्त आहे हेही सिद्ध झाले.’’
—————————————————
अग्निहोत्रच्या राखेमुळे पाणी शुध्द
अग्निहोत्राची राख जंतुनाशक असल्याचे आढळून आल्यामुळे जखमा, त्वचारोग ह्यावर ती अत्यंत उपयुक्त ठरते हेही प्रयोगानिशी सिद्ध झाले. अग्निहोत्र राखेमुळे अशुद्ध पिण्याच्या पाण्यातील जंतू व क्षाराचे प्रमाण ८०% ते ९०% पेक्षा कमी झाल्याचे सर्वसामान्यपणे आढळून आल्यावर अग्निहोत्राचा पाणी शुद्धीकरणासाठीही उपयोग होतो हे सिद्ध झाले.
—————————————————
अग्निहोत्र प्रयोगातील महत्त्वाचे मुद्दे
१. अग्निहोत्रामुळे आकाश व उष्णता उर्जेत बदल
२. धुराचा सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर परिणाम
३ धुराचा हवेतील प्रदूषणावर परिणाम
४. धूर व राखेचा रोपांच्या/ बी, बियाण वाढीसाठी उपयोग
५. राखेने पाणी शुद्धीकरण.
————-