आयसीसीआर व पुणे विद्यापीठ यांच्या ‘युनिव्हर्सलायजेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडियन नॉलेज सिस्टिम्स’(युटिक्स) या उपक्रमाच्या सामंजस्य करारावर आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी स्वाक्षरी केली. यावेळी दीपक करंजीकर, डॉ. अपूर्वा पालकर, ज्येष्ठ निर्माता दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, अधिसभा सदस्य राजेश पांडे, प्रसेनजित फडणवीस, एन. के. मालिक, डॉ. भूपाल पटवर्धन उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येत्या १३ एप्रिल रोजी हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, भारतीय पारंपरिक ज्ञानाबद्दल जगाची साक्षरता वाढवणे, तसेच गूढ वातावरणाची योग्य माहिती सर्वांना पोहोचविणे, रूढ असलेले अपप्रचार, गैरसमज दूर करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणे, या दृष्टिकोनातून हा करार करण्यात आला आहे.
केवळ उपलब्ध असलेली माहिती देण्याऐवजी भारतीय पारंपरिक ज्ञानाचे आजच्या काळाच्या दृष्टीने आकलन व्हावे, यावर पुढील काळात भर दिला जाणार आहे, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.
-------
विद्यापीठाला एमिनन्सचा दर्जा
केंद्र शासनाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्सच्या योजनेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला स्थान मिळावे यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला मी स्वत: पत्र दिले असल्याची माहिती डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितली. त्याचप्रमाणे परदेशातून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामाईक सीईटी प्रस्तावित असून त्यावर शिक्षण मंत्रालयाचे काम सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
फोटो : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करारप्रसंगी डॉ. विनय सहस्रबुद्धे व डॉ. नितीन करमळकर आणि इतर.