लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महामेट्रो कंपनी व आप रिक्षा संघटना यांच्यात प्रवाशांसाठी झालेला करार बेकायदेशीर असल्याचा आरोप रिक्षा पंचायत या संघटनेने केला. महामेट्रोला अशा कराराचा अधिकारच नसून त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा पंचायतीने दिला. महामेट्रोने या करारासाठी सर्वप्रथम पंचायतीलाच विचारले होते, मात्र सर्व रिक्षाचालक समान या व्यापक भूमिकेवरूनच आम्ही करार करायला नकार दिला, असा दावा पवार यांनी केला.
या करारामुळे विशिष्ट रिक्षाचालकांना फायदा होणार असला तरी बहुसंख्य रिक्षाचालकांचा मात्र तोटा होणार असल्याचे पंचायतीचे म्हणणे आहे. सरचिटणीस नितीन पवार यांनी या कराराच्या विरोधात बाधित रिक्षाचालकांसह सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला.
महामेट्रो कंपनीने त्यांच्या प्रवाशांना मेट्रो स्थानकापासून घरापर्यंत प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी हा करार केला आहे. त्यानुसार मेट्रोच्या स्थानकात फक्त करार झालेल्या रिक्षा संघटनेच्या सदस्य रिक्षा चालकांनाच प्रवेश मिळेल. त्यासाठी रिक्षावर स्टिकर असेल. मेट्रोचे तिकीट या रिक्षातून काढता येईल. त्यासाठी महामेट्रो एक मोबाईल अॅप चालकांना देणार आहे
पवार म्हणाले, “विमानतळ, एसटी, पीएमपीएल यापेक्षा मेट्रो वेगळी नाही. तिथे असा अडसर नाही, मग मेट्रोलाच का? व्यवसाय करण्याचा सर्व चालकांंना समान अधिकार आहे. त्यामुळेच हा करार बेकायदा आहे. मेट्रो स्थानकांच्या परिसरात अनेक रिक्षाचालक वर्षानुवर्षे व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर यामुळे गदा येईल.” अशोक मिरगे, बाळासाहेब भगत व अन्य अनेक रिक्षाचालक या वेळी उपस्थित होते.
रिक्षा किंवा सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या नियमनाचे अधिकार असलेल्या सरकारी यंत्रणा वेगळ्या आहेत. त्यात महामेट्रो नाही. त्यांना असा कोणताही अधिकार नाही. त्यांच्या विरोधात सर्व सरकारी यंत्रणांना निवेदन देणार आहोत. त्याची दखल घेतली नाही तर पिंपरी-चिंचवड व पुणे या दोन्ही शहरांमध्ये या कराराच्या विरोधात आंदोलनाचा इशारा रिक्षा पंचायतीने दिला.