पुणे : स्मार्ट सिटी योजनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने (पीएससीडीसीएल) दोन संस्थांबरोबर सामंजस्य करार केले. यातील एक संस्था परदेशी असून, या संस्थेमार्फत जगातील विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची माहिती स्मार्ट सिटी कंपनीला देण्यात येणार आहे. ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया (जीसीएनएल) या संस्थेबरोबरही कंपनीच्या कामाकाजाच्या रचनेसंबधी करार करण्यात आला.युरोपियन बिझनेस अॅण्ड टेक्नॉलॉजी सेंटर (ईबीटीसी) असे परदेशी संस्थेचे नाव आहे. युरोपातील सर्व प्रगत स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्रित येऊन हे सेंटर सुरू केले आहे. गेली अनेक वर्षे ते या पद्धतीचे तंत्रज्ञानाची माहिती पुरविण्याचे काम करीत असून, आता त्यांनी त्यासाठी पुणे शहराची निवड केली आहे. जगभरात विविध देशांमध्ये अनेक प्रकारच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी बरेच प्रकल्प सुरू असतात. त्यात वापरलेल्या तंत्रज्ञानाची माहिती या संस्थेच्या वतीने पुणे स्मार्ट सिटी कंपनीला या करारान्वये देण्यात येईल. त्याचबरोबर कोणत्या समस्या सोडवण्यासाठी कोणती उपाययोजना प्रभावी ठरेल, ती कशी वापरायची, याबाबतही सल्ला देण्यात येईल. संस्थेचे प्रतिनिधी पॉल जेन्सन अन्य वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक तथा महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, आदी या वेळी उपस्थित होते. संस्थेबरोबर कंपनीने दोन वर्षांचा करार केला आहे. पुण्याबरोबरच उत्तर प्रदेशातील लखनौ शहराबरोबरही त्यांनी करार केला आहे. (प्रतिनिधी)
पुणे स्मार्ट सिटी कंपनीचे दोन संस्थांशी करार
By admin | Published: September 22, 2016 1:56 AM