पुणे : पाणी व ऊर्जेच्या क्षेत्रात भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर संशोधन करण्यासाठी ‘ब्रिक्स’ देशांच्या अनुदानातून ‘युनिव्हर्सिटी आॅफ साऊथ आफ्रिका’ (युनिसा) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी करार करणार आहे. या कराराच्या माध्यमातून नॅनो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने पाणी व उर्जेच्या क्षेत्रात भरीव संशोधन करण्याचा प्रयत्न आहे.‘ब्रिक्स’ देशांचे शिष्टमंडळ भारतासह चीन, दक्षिण आफ्रिका या देशांच्या दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने विद्यापीठालाही भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत ही संकल्पना स्पष्ट केली. शिष्टमंडळामध्ये युनिसाच्या संशोधन विभागाचे उपप्राचार्य प्रा. एम. फाकेंग, पाणी संशोधन विभागाचे प्रा. बी. मंबा, नॅनोसायन्स अॅन्ड नॅनोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रा. एम. माझा आणि प्रा. व्ही. व्ही. श्रीनिवासु यांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. के. सी. मोहिते यांच्या प्रयत्नातून करार होणार आहे.भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांमध्ये पाणी, उर्जा, सौर उर्जा आणि विविध क्षेत्रात नॅनो टेक्नॉलॉजी व नॅनो सायन्सचा वापर करून संशोधनाला चालना देण्याचे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याविषयी बोलताना डॉ. फाकेंग म्हणाल्या, पाणी, उर्जा, कचरा व्यवस्थापन अशा काही समान समस्या भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून एक पुल बांधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आपण आता नवीन तंत्रज्ञान व संशोधनाबाबत पाश्चिमात्य देशांवर फार काळ अवलंबून राहू इच्छित नाही. आपले स्वत:चे शास्त्रज्ञ आणि संशोधक तयार व्हायला हवेत.(प्रतिनिधी)नॅनो टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात मोठे संशोधन सुरू असले तरी ‘युनिसा’शी होत असलेल्या करारामुळे येथील विद्यार्थी आणि संशोधकांना इतर ‘ब्रिक्स’ देशांतील संशोधक व शास्त्रज्ञांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. लवकरच दोन्ही विद्यापीठांमध्ये करार होईल, असे डॉ. मोहिते यांनी सांगितले.
पाणी, ऊर्जा क्षेत्र संशोधनासाठी करार
By admin | Published: April 26, 2015 1:15 AM