नारायणगाव - राज्यात सन २०१८-१९ पासून कृषी तंत्रनिकेतन हा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत विद्यापीठांना कळविण्यात आले होते. मात्र, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे, असे आश्वासन राज्यस्तरीय कृषी तंत्र आणि संलग्न संस्थामहासंघाच्या बैठकीत पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहे, अशी माहिती ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर यांनी दिली.कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रमात आलेल्या या समस्येबाबत कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची बैठक नुकतीच सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे पार पडली. या बैठकीसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर, कृषी सचिव विजय कुमार, संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील,आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार दिगंबर विसे, अनिल मेहेर, श्रीकांत घोगरे, दत्ता पानसरे, प्रभाकर चांदणे, अरविंद पोटे, ज्ञानदेव वाफारे, प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड, सोमनाथ काटकर, गोविंद साळुंके उपस्थित होते.या वेळी विद्यापीठाचे पातळीवरून कृषी तंत्र निकेतन पदविका अभ्यासक्रम बंद करण्यासाठी केलेली शिफारस ही विद्यार्थीविरोधी आणि राज्याच्या कृषिविकासासाठी कशी घातक आहे, हे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. पाचव्या अधिष्ठाता समितीच्या अहवालामध्ये कृषी पदवी अभ्यासक्रम बदल करून जास्तीत जास्त व्यावसायिक करण्याबाबत समितीने सुधारित अभ्यासक्रम शिफारस केला आहे. त्याच आधारे कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम व्यावसायिक आणि सुधारित करावा, असे निवेदन मेहेर यांनी केले.या प्रश्नांबद्दल विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या संदर्भात निवेदन दिले असून, हा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची जोरदार मागणी केली आहे. या बैठकीनंतर फुंडकर यांनी उपसचिव व शिक्षण संचालक यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू राहणार - पांडुरंग फुंडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 2:38 AM