लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना महामारीच्या कालावधीत शेती क्षेत्र मात्र बहराला आले. शेतमालाला स्थानिक व परदेशी बाजारपेठ मिळाल्याने कोट्यवधी रूपयांची उलाढाल झाली. शेतमाल निर्यातीमध्ये सुमारे बारा हजार कोटींची वाढ झाली.
दुकाने, व्यवसाय, उद्योगधंदे लॉकडाऊनमध्ये बंद पडलेले असताना शेतकरी मात्र राबत होता आणि उत्पन्नही मिळवत होता. मार्च ते नोव्हेंबर २०२० या ८ महिन्यांमध्ये महाराष्ट्रातून ६६ हजार ४९८ कोटी रूपयांचा शेतमाल निर्यात झाला. गेल्या वर्षी याच काळात ५४ हजार ६५० कोटी रूपयांची उलाढाल भाजीपाला निर्यात क्षेत्रात झाली होती. स्थानिक बाजारपेठेतील उलाढाल यापेक्षाही मोठी आहे.
संपूर्ण जग घरात बंद झाल्यामुळे खाद्यपदार्थांची मागणी वाढली होती. टाळेबंदीतून अत्यावश्यक सेवा म्हणून फळे, भाजीपाला, धान्य वाहतूक तसेच कृषीक्षेत्राशी संबंधित कंपन्यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे निर्यातीसाठी आवश्यक जहाजांचे कंटेनर, विमाने तसेच माल वाहतूक करणाऱ्या कंपन्या यांचे काम विना अडथळा सुरू होते. कृषी खाते या काळात काम करत होते.
सरकारी यंत्रणानीही या काळात शेतीक्षेत्राला भरपूर मदत केली. राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यात शेतीचे नुकसान झाले, मात्र या नैसर्गिक संकटातूनही शेतकरी अल्पावधीत सावरला. त्यामुळेही उत्पन्नात फरक पडल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.
चौकट
“आमच्या कंपनीचे १० हजार शेतकरी सदस्य आहेत. वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आम्ही पिकवतो. कोरोना टाळेबंदी काळात आम्ही निर्यात व स्थानिक बाजारपेठेत मिळून अडीचशे कोटी रूपयांची उलाढाल केली. शेतमालाचा दर्जा सांभाळणे, निर्यात मालाच्या सर्व कसोट्या पूर्ण करणे, बाजारपेठेची मागणी या सगळ्याकडे लक्ष ठेवल्याने हे शक्य झाले.”
-विलास शिंदे, संचालक, सह्याद्री फार्म