थकबाकीमुळे महावितरणची कारवाई
उंडवडी कडेपठार: गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे हाताला न मिळालेले काम, त्याचबरोबर अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच वीजपंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेती अडचणीत आली आहे.
महावितरणच्या ग्राहकांनी कोरोनामुळे जवळजवळ वर्षभर महावितरणचे वीजबिल भरले नाही. त्यामुळे वरचेवर थकीत बिल वाढतच आहे. ही थकबाकी न भरल्यामुळे महावितरणाकडून जराडवाडी गावातील बनवाडी येथे बनवाडी ए. जी. आणि बनवाडी इडिशनल अशा दोन ट्रान्सफाॅर्मरचा गुरुवारी (दि. ११) रोजी कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पिकांना पाणी न मिळाल्याने पिके सुकून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला आहे. मध्यंतरी वीजबिल माफ करावे, त्यात सूट द्यावी अशी मागणी केली जात होती. त्यातच राजकारणी नेत्यांकडून कोरोना काळातील वीजबिल भरू नका, असे सांगितले जात होते. वीजबिल न भरल्याने त्याची थकबाकी मात्र वरचेवर वाढत गेल्यामुळे बिलाच्या रकमेचा मोठा डोंगरच उभा राहिला असल्याने आता मात्र शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
————————————————
१) बनवाडी ए.जी - कनेक्शन - ३५ - थकबाकी रक्कम - २१,२३,७१९ रुपये.
२) बनवाडी इडिशनल - कनेक्शन- १९ - थकबाकी रक्कम- १४,५६,००० रुपये.
——————————————
शेतक-यांना कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणच्या कर्मचा-यांनी विद्युत रोहित्रचा वीज पुरवठा खंडित केला. मुळातच करोनाच्या, मागील अवकाळी पावसाच्या (ढगफुटी) या संकटातून शेतकरी राजा कसाबसा सावरतो न सावरतो तोच महावितरणने केलेल्या कारवाईमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे.
अमोल जराड, शेतकरी बनवाडी.
————————————————
मागील ३ ते ४ वर्षे आमची पूर्ण दुष्काळात गेली आहेत. वीज बिल हे पूर्ण वर्षभरासाठी ढोबळ पद्धतीने आकार ले जाते. पण या परिसरातील विहिरींचे पाणी हे ४ ते ५ महिने पुरते इतर काळ हा कोरडा जातो. परंतु शेती पंपाचे वीज बिल पूर्ण वर्षाचे आकारले जाते ही पध्दत पूर्ण बागायती भागाला लागू होऊ शकते. ग्रामीण परिसरात वर्षाचे बिल आकारले जाते हा जिरायती भागासाठी अन्याय आहे.
-अनिल साळुंके
शेतकरी, जराडवाडी