लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खरिपाचा हंगाम भरघोस उत्पादनाचा व्हावा यासाठी कृषी विभागाच्यावतीने राज्यात ‘कृषी संजीवनी’ अभियान होणार आहे. कृषी संचालक विकास पाटील यांनी माहिती दिली. २१ जून ते १ जुलै दरम्यान कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधावर जाऊन आधुनिक तंत्राची, तसेच उत्पादन वाढ कशी करायची याचे मार्गदर्शन करणार आहेत.
संपूर्ण राज्यात ही मोहिम राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतजमिनीच्या पेरणीपूर्व मशागतीपासून बीजप्रक्रिया व खतमात्रा कोणती? किती? कशी द्यायची?, याबाबतच्या मार्गदर्शनाचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना यात सहभाग बंधनकारक आहे. कोणत्या दिवशी कोणता विषय निवडायचा याची रचनाही निश्चित करण्यात आली आहे. या सर्वांनी त्यांचा या आठ दिवसांतील कामाचा रोजचा अहवाल आपापल्या वरिष्ठांना सादर करायचा आहे.
पाटील म्हणाले की, यात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीची माहिती मिळेल. वेगळे प्रयोग करणाऱ्या, भरघोस उत्पादनासाठी पारितोषिक प्राप्त शेतकरी, तंत्रज्ञ यांना यात सामावून घेण्यात आले आहे. एखाद्या साध्या बदलानेही उत्पादनात वाढ होऊ शकते, अशा सिद्ध झालेल्या प्रयोगांच्या शेतकऱ्यांनाही यामध्ये अन्य शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी बरोबर घेण्यात येणार आहे.