बारामती : शिक्षण व कृषी विभागामार्फत शालेय अभ्यासक्रमात लवकरच कृषी अभ्यासक्रम समाविष्ट केला जाणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला.
महा ऑरगॅनिक ॲण्ड रेस्यूड्यू फ्री फार्मस असोसिएशन (मोर्फा) च्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. मोर्फाची टीम सिक्कीमच्या अभ्यास दौऱ्यावरून आल्यावर गोविंद बाग येथे पवार यांची भेट घेत युगेंद्र पवार, अंकुश पडवळे, प्रल्हाद वरे, स्वाती शिंगाडे यांनी ही मागणी मांडली होती, त्याची पवार यांनी दखल घेतल्याने मोर्फाच्या मागणीला यश आले आहे.
शेतीशी निगडित कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. कृषी विषयाच्या शालेय अभ्यास क्रमातील समावेशबाबत, शालेय शिक्षणमंत्री प्रा. गायकवाड, कृषी मंत्री भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत बैठक झाली. शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणार असून शिक्षण व कृषी विभागामार्फत लवकरच अभ्यासक्रम समाविष्ट केला जाणार असल्याचे ‘मोर्फा’च्या सूत्रांनी सांगितले.
कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करण्यासाठी निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मुंबई येथील बैठकीत सहभागी झालेल्या वर्षा गायकवाड, दादाजी भुसे, विश्वजित कदम . २७०८२०२१ बारामती—०२