लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कृषी कायदा काहीही झालं तरी रद्द होणार नाही. त्यात फक्त बदल केला जाईल, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच शेतमाल कुठं ही विकता येणार तरी आंदोलनाचा आग्रह कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकार यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पाटील आले. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार यांनी आंदोलन दिल्ली पुरतं सीमित राहणार नसून, राष्ट्रपतींची भेटणार असल्याचे नुकतेच सांगितले होते. यावर बोलताना पाटील म्हणाले, देशात लोकशाही असल्याने राष्ट्रपतींना कोणीही भेटू शकते. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी आमच्या सर्वांना शुभेच्छा असून, ते भेट घेत असतील तर त्याचे स्वागतच आहे.
सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊनच कृषी कायदा तयार केला आहे. त्या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार असून, केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होते तेच असून, फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेरही आपला शेतमाल विकता येणार आहे. शेतकऱ्यांना ‘एमएसपी’जी अगोदर ऑन पेपर नव्हती ती आता ऑन पेपर येणार असून, सरकार त्यास तयार आहे. असे असताना आम्ही आंदोलन करणार, भारत बंद करणार अशा बोलण्याला काहीच अर्थ नाही.
दरम्यान चंद्रकांत दादांनी हिमालयात जावं या शिवसेनेच्या सल्ल्यावर मात्र उत्तर देणे पाटील यांनी यावेळी शिताफीने टाळलं.