पुणे : बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सहकार्याने इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात वातावरणातील बदल व कृषी तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच मायक्रोसॉफ्ट व बिल गेटस् फाउंडेशनतर्फे बारामतीत फार्म ऑफ द फ्युचर अर्थात भविष्यातील शेती उभारण्यायात येणार आहे. तसेच आधुनिक तंत्राचा वापर करून ऊस उत्पादन तसेच साखर उताऱ्यात वाढ याबाबतही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याची माहिती व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
पवार यांच्या हस्ते या अभ्यासक्रमाचा प्रारंभ गुरुवारी (दि. २६) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आला. यावेळी ऑक्सफर्डचे अजित गावकर, सारंग नेरकर, प्रशांत मिश्रा, प्रतापराव पवार, डॉ. शंकरराव मगर, विष्णू हिंगणे, शिवाजीराव देशमुख, संभाजी कडू पाटील उपस्थित होते. वातावरणातील बदलामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रासाठी वापर करून मूल्यवर्धित साखळी विकसित करण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या शंभरहून अधिक देशांमधील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.
ट्रस्टच्या बारामती येथील प्रक्षेत्रावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फार्म ऑफ द फ्युचर अर्थात भविष्यातील शेती हा प्रकल्प उभारण्याचे काम बिल गेट्स फाउंडेशन, मायक्रोसॉफ्ट तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने सुरू करण्यात आला आहे. हे प्रत्याक्षिक बारामतीत जानेवारीमध्ये होणाऱ्या कृषी प्रदर्शनामध्ये मांडले जाणार आहे असेही त्यांनी सांगितले. ऊस उत्पादन तसेच साखर उताऱ्यात वाढ होण्यासाठी अद्ययावत सेन्सर आणि उपग्रह माहितीचा वापर करून उसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी वापर करण्यात येणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर वापरण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली.