पुणे : जून महिना कोरडा गेल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांवर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली असून, जिल्ह्यात पावसाने २४६.३२ मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, जुलै महिन्याच्या अवघ्या ६ दिवसांत १६५.११ मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेती, जनावरांना चारा, पिण्याला पाणी असे सगळेच प्रश्न सुटल्याने समाधानाचे वातावरण आहे.सध्या पाऊस सुरू असल्याने पेरण्या होत नसल्या, तरी पाऊस थांबल्याबरोबर पेरण्यांना वेग येईल. तसेच, भातशेतीला हा पाऊस अत्यंत उपयुक्त असून, भातरोपे लवकर तयार होऊन आवण्यांना सुरवात होईल. पुणे वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात पुण्यात सरासरी १४२.४० मिमी आणि जुलै महिन्यात २९५.६८ मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) देशात आणि महाराष्ट्रातही उशिरा आगमन केले. त्यामुळे तो उशिरा दाखल झाला. जून महिन्याचा शेवटचा आठवडा वगळता संपूर्ण महिना कोरडा गेला. जून महिन्यात शहरात ८१.३६ मिमी पाऊस झाल्याने पेरण्याही रखडल्या. खरिपाच्या पेरण्या होतात की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ४.३७ टक्के इतक्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यात सर्वाधिक सोयाबीनच्या ३३.६, मुगाच्या ३२.४, मका १५.७, बाजरी १०.६, भात ४.८, ज्वारी २.९,उडीद ९.३, भुईमूग ३.६ टक्के इतक्याच पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जुलै महिना पाऊस घेऊन आला. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली. विशेष म्हणजे बारामती, इंदापूर, दौंड या कमी पर्जन्यमान असलेल्या भागातही चांगला पाऊस झाला आहे. आतापर्यंत जुलै महिन्यात १६५.११ मिलिमीटर पाउस झाला आहे. त्यामुळे जुलै महिन्याची २९५.६८ मिलिमीटरची सरासरी ओलांडून जूनचा बॅकलॉग पाऊस भरून काढेल, अशी शक्यता आहे. जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस मावळ व मुळशी या तालुक्यांत झाला असून, मुळशीत ४६५.४०, तर मावळमध्ये ४४२ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. (प्रतिनिधी)आतापर्र्यंत झालेला पाऊसआंबेगाव ११८.६०बारामती१३०.५०भोर ३१३.७०दौैंड १३८.६०हवेली ११५.७०इंदापूर १७४.४०जुन्नर १८२.७०खेड २२०.२०मावळ ५५१.३०मुळशी ५७८.९०पुरंदर ९०.७०शिरूर ९०.४०वेल्हा ४९६.४०सरासरी २४६.३२
शेती, चारा, पाण्याचा प्रश्न सुटला!
By admin | Published: July 08, 2016 3:54 AM