पुणे : शेतकऱ्यांना त्यांच्या भागातील हवामान, पाणी, जमीन याविषयी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हवामान विभागाच्या वतीने देशभरात २०० कृषी हवामान स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील १० केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांची उभारणी सुरू केली असून येत्या पावसाळ्याच्या आत ती कार्यान्वित होणार आहेत.
उपकरण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना जमिनीतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग, त्यामुळे होणारे बाष्पीभवन हे पिकाच्या वाढीसाठी आणि पिकाला पाणी देण्यासाठी महत्त्वाचे असते. या कृषी केंद्रामधून शेतकऱ्यांना तेथील जमिनीतील आर्द्रता, कमाल व किमान तापमान, वाऱ्याचा वेग, दिशा याची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर जमिनीत किती खोलवर ओलावा आहे, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे, याची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशभरातील जवळपास २०० कृषी हवामान स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्राच्या उभारणीचे काम सध्या सुरू आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी ही केंद्रे सुरू होतील.
क्लायमेट डेटा सर्व्हिस पोर्टलचे आज उद्घाटनजागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने हवामान विभागाकडून क्लायमेट डेटा सर्व्हिस पोर्टलचे मंगळवारी उद्घाटन अर्थ सायन्सचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांच्या उपस्थितीत ऑनलाइन होणार आहे. डॉ. डी. एस. पै हे या पोर्टलबाबतची माहिती सांगणार असून डॉ. एस. डी. अत्री हे प्रास्ताविक करतील.
महाराष्ट्रातील केंद्रेपालघर, सोलापूर, नंदुरबार, औरंगाबाद, उस्मानाबाद, वाशिम, नागपूर, गडचिरोली, बुलडाणा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये कृषी स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्रे सुरू होणार आहेत.