लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एकीकडे महावितरणची थकलेली बिले भरण्यास महापालिकेकडे पैसे नाहीत. दुसरीकडे पालिका चक्क ८८ लाख रुपये खर्चून ‘बोलणारी’ झाडे खरेदी करणार आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करुन होणाऱ्या ‘तीन’ झाडांच्या खरेदीत पालिकेला एक झाड २९ लाख ३३ हजार रुपयांना पडणार आहे. पालिकेच्या विद्युत विभागाकडून हा घाट घातला जात असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
पालिकेला महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेसाठी २०० कोटींचे कर्ज काढावे लागत आहे. पालिकेची अनेक बिले थकलेली आहेत. अशा परिस्थितीत पालिकेकडूनही उधळपट्टी कोणाच्या ‘दबावा’खाली केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोरोनाकाळात पालिकेचे उत्पन्नाचे स्रोत घटले आहेत. केवळ मिळकतकराच्या उत्पन्नावर पालिकेचा डोलारा उभा आहे. पालिकेला जेमतेम साडेचार हजार कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. पालिकेला मार्चअखेरीस विकासकामांची जवळपास पाचशे ते सहाशे कोटींची बिले द्यावी लागणार आहेत. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने विकासकामे थांबवत आवश्यक बाबींसाठीच खर्च करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. हा आदेश काही दिवसच पाळला गेला. मात्र, पुन्हा उधळपट्टी सुरू झाली आहे.
चौकट
गेल्या काही दिवसांत विद्युत विभाग या ना त्या कारणावरून चर्चेत आहे. विद्युत विभागाकडे पालिकेच्या इमारती, कार्यालये तसेच इतर आस्थापनांची वीजबिल भरण्याची जबाबदारी आहे. निधी संपल्याने वारंवार अन्य प्रकल्पांचा निधी वर्गीकरणाद्वारे घेऊन गाडा हाकला जात आहे. या स्थितीत असतानाही विद्युत विभागाकडून मात्र बोलणाऱ्या झाडांवर अनावश्यक उधळपट्टी सुरू आहे.
चौकट
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभाग १२ क मधील बाळासाहेब ठाकरे उद्यानात ८८ लाख रुपयांची ही तीन झाडे असणार आहेत. या झाडांना इलेक्ट्रॉनिक डिवाइस बसविण्यात येणार असून, नागरिक झाडाजवळ गेल्यानंतर ही झाडे त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले. पर्यावरण तसेच वृक्षसंवर्धनाची माहिती ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात देण्याची संकल्पना यामागे आहे.