एखाद्या व्यक्तीने सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग वेबसाइट्स, विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्स इत्यादीचा वापर केलेला असतो. त्यातून प्राप्त डेटाचा वापर मोठ्या ताकदीच्या संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने विश्लेषण केले जाते. त्यानंतर संबंधित व्यक्तीची अचूक आवड तसेच त्याच्या वर्तनाचे विविध पैलू शोधणे शक्य झाले आहे. यापुढे जाऊन आता एखादी गोष्ट किंवा वस्तू त्या व्यक्तीला आवडावी त्यासाठी ती व्यक्ती वापरत असलेल्या विविध प्लॅटफॉर्म्सवरून संबंधित माहितीचा भडीमार करता येतो.
सध्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स (एआय) तसेच संगणकाबाबत खूप चर्चा सुरू आहे; परंतु नीट पाहिले तर तो पूर्ण गोष्टीचा अर्धाच भाग आहे. उर्वरित भाग हा जैविक ज्ञानाचा आहे. हे जैविक ज्ञान ब्रेन सायन्स आणि जीवशास्त्र यांच्या अभ्यासातून प्राप्त झाले आहे. जेव्हा आपण हे जैविक ज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडतो. त्यावेळी माणसाच्या आवडी निवडी आणि त्याच्या वर्तनाचा अंदाज बांधता येऊ शकतो. केवळ अंदाज बांधण्यापर्यंत न थांबता हे प्रोग्रॅम एखादी विशिष्ट आवड रुजवण्याचा प्रयत्न देखील करू शकतात. विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्स त्यांच्या प्रत्येक ग्राहकाला त्याने पाहिलेल्या कन्टेन्टच्या आधारे त्याला इतर आवडू शकणारे कन्टेन्ट सतत सुचवत असतात. हेच आपण विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये देखील अनुभवू शकतो.
आता ऑनलाइन शॉपिंग पोर्टल देखील अतिशय आधुनिक एआयवर आधारित अल्गोरिदमचा वापर करून प्रत्येक ग्राहकाचा प्रोफाइल तयार करीत असते. ज्यात त्याचा स्पेंडिंग पॅटर्न, त्याने केलेल्या विविध प्रॉडक्टच्या सर्चिंगची हिस्ट्री, तसेच अन्य डेटा स्रोत वापरून त्याला कोणकोणत्या वस्तू आवडू शकतील, याचा अंदाज बांधता येतो. त्या संबंधित प्रॉडक्ट किंवा प्रॉडक्ट डील त्याला डॅशबोर्डवर सुचवली जाते. त्यामुळे आता केवळ एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना उद्युक्त करणे हेही काम प्रगत एआयवर आधारित प्रोग्रॅम करू लागले आहेत.
नवनवीन तंत्रज्ञानाचा सर्वच क्षेत्रांमध्ये वेगाने अंतर्भाव होत असल्याने येणाऱ्या काळात नेमके कोणत्या प्रकारचे जॉब अस्तित्वात येतील याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे. त्यामुळे नेमके कोणते शिक्षण आज घ्यावे याचा देखील अचूक अंदाज बांधणे कठीण आहे. सध्या शाळा महाविद्यालयांमध्ये शिकलेले ज्ञान भावी काळातील जॉबसाठी सुसंगत राहील का? हादेखील प्रश्नच आहे, तर अशा परिस्थितीत नेमके कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे? प्रसिद्ध लेखक, प्रोफेसरही या प्रश्नाचे उत्तर देताना असे म्हणतात की, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना ज्ञान संपादनाबरोबरच त्यांचे मानसिक संतुलन आणि भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यावर जास्त भर देणे अत्यावश्यक आहे.
एआय आणि मशीन लर्निंग यांचा शिरकाव झाला तरीही मूलभूत क्षेत्रातील मनुष्यबळ त्याने रिप्लेस होणार नाही, तर त्यांच्या कामामध्ये जास्त अचूकता येईल. तसेच त्यांची कार्यक्षमता वाढेल; पण त्यासाठी त्यांना कामातील नवीन बदल आत्मसात करावा लागेल. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर मेडिकल क्षेत्रात एआयचा वापर करून आधुनिक टेस्टिंग मशीन तयार होत आहेत. त्यात येणाऱ्या रुग्णाच्या केवळ चेहेऱ्याचे स्कॅनिंग करून, त्वचेला सेन्सर लावून त्याचा रक्तदाब तसेच इतर अनेक प्रकारे विश्लेषण तात्काळ करू शकतो. त्यामुळे त्याचे रोग निदान अचूक व कमी वेळात शक्य होत आहे; पण येथे मूलभूत घटक डॉक्टर किंवा टेस्ट करणारे लोक तसेच राहत आहेत. फक्त त्यांना या नवीन प्रकारच्या चाचण्या कशा करायच्या व कशा अभ्यासाव्यात यासंदर्भातील अभ्यास करावा लागणार आहे.
ढोबळमानाने सद्य:स्थितीत माणसाचे आयुष्य २ टप्प्यांत विभागले जाते. पहिला टप्पा म्हणजे शिक्षण संपादन आणि दुसरा टप्पा म्हणजे नोकरी, व्यवसाय करून अर्थार्जन करणे. पहिल्या टप्प्यात आपण योग्य शिक्षण तसेच कौशल्य शिकून स्वत:ची स्थिर ओळख निर्माण करतो. त्याचा वापर करून पुढे आयुष्यभर आपण पैसे कमावतो. तसेच समाजाप्रती योगदान देतो; परंतु अनेक विचारवंतांच्या मते येणाऱ्या काळात सन २०४०च्या नंतर हे मॉडेल बदणार आहे. तसेच मनुष्याला शिक्षणाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतरही व्यवसाय, नोकरी करताना नवनवीन कला शिकत राहाव्या लागणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिरकाव विविध क्षेत्रांत वाढत जाईल तसतसे त्याअनुषंगाने होणारे बदल व लागणारी कौशल्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आत्मसात करावी लागतील.
येणाऱ्या काळात शाळा, महाविद्यालयांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. इंटरनेटचा प्रसार होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना माहितीचे विविध स्रोत कमी होते. त्यामुळे पूरक माहिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करणे व ती समजावून सांगणे हे शाळा, महाविद्यालयांचे प्रमुख काम होते; परंतु आता इंटरनेटच्या प्रसारामुळे विद्यार्थ्यांना माहितीचे अनेक स्रोत खुले झाले आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांची भूमिका उपलब्ध माहिती संकलित करणे तसेच त्यातील सुसंगत किंवा संबंधित माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, अशी बदलत आहे.
विद्यार्थ्यांनी मूळ पदवीसोबतच त्याला सुसंगत एखादे कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. हे कालानुरूप येणारे कौशल्य सातत्याने आत्मसात करावे लागणार आहे. त्याची मानसिक तयारीही आतापासून करावी लागणार आहे.
- दीपक हर्डीकर, संगणकतज्ज्ञ, पुणे