पुणे : बॅडमिंटनच्या क्षेत्रात आजवर मी जे काही मिळविले त्यात आई-वडील तसेच प्रशिक्षक यांचा वाटा मोलाचा आहे. त्यांच्यामुळेच मी घडलो, अशी भावना ज्येष्ठ बॅडमिंटन प्रशिक्षक उदय पवार यांनी रविवारी व्यक्त केली. महाराष्ट्रीय मंडळातर्फे देण्यात येणारा कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार पवार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पालकांनी आपल्या मुलांना क्रीडा क्षेत्रातील सहभागासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आदर्श शिक्षक, शिक्षिका यांनाही गौरविण्यात आले. या वेळी महाराष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी धनंजय दामले यांनी लिहिलेल्या ‘रहा निरोगी’ या पुस्तकाचे प्रकाशनही करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्रीय मंडळाचे सरकार्यवाह धनंजय दामले यांनी केले. राजेश दामले व अंजली जोशी यांनी सूत्रसंचालन केले.पुरस्कार विजेते :कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार : उदय पवार, कॅप्टन सुशांत गोडबोले स्मृती पुरस्कार : अँड्रीया फ्रान्सिस, ले. ज. यशवंत सहस्रबुद्धे स्मरणार्थ क्रीडा पत्रकार पुरस्कार : दिगंबर शिंगोटे; विशेष पुरस्कार : ड्युजन स्मार्तआदर्श शिक्षक : अनुश्री बोरकर (कमलाबाई दामले प्रशाला), प्रिया वझे (इंदिराबाई करंदीकर प्राथमिक प्रशाला), नीता देशमुख (महाराष्ट्रीय मंडळ माध्यमिक प्रशाला), संजय सातपुते (कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशाला), अभिजित भोसले (व्यायाम शाळा टिळक रोड), गणेश कदम (पुणे व्यायाम शाळा गुलटेकडी), महेश देशपांडे (चंद्रशेखर आगाशे कॉलेज), संपदा खेरडीकर (महाराष्ट्रीय मंडळ प्री. प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल (मुकुंदनगर), नील सोनवणे (महाराष्ट्रीय मंडळ ज्युनिअर कॉलेज (वाणिज्य), संजय शेंडगे (शेठ दगडूराम कटारिया हायस्कूल), पल्लवी कव्हाणे (योगा अकादमी), संध्या लाळे (निवृत्त, इंदिराबाई करंदीकर प्राथमिक प्रशाला), रामदास भुजबळ (निवृत्त, कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशाला). शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार :राजीव तिकोणे.
आई-वडील, प्रशिक्षकांमुळे घडलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:41 AM