लोणावळा : लोकसभेच्या निवडणुकीसाठी फार कमी वेळ राहिला आहे. आता निवडणुका सायंटिफिक पद्धतीने लढवल्या पाहिजेत यावर चर्चा झाली आहे. बुथ मॅनेजमेंट हे सर्वांत महत्त्वाचे आहे. इंडिया आघाडीला सत्तेत आणण्यासाठी काम केले पाहिजे आणि राज्यातून सर्व ४८ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी काँग्रेसच्या शिबिरात केले.
लोणावळ्यातील दोन दिवसांच्या राज्यस्तरीय शिबिरात समारोपाचे मार्गदर्शन करताना चेन्नीथला पुढे म्हणाले की, भाजप लोकशाहीला संपविण्यासाठी बसले आहेत. आता आपल्यासमोर 'करा किंवा मरा' अशी परिस्थिती आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर भाजप सातत्याने टीका करत असतात त्यामागे गांधी-नेहरूंची विचारधारा संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्यात एकजूट असला पाहिजे. सर्व सेल फ्रंटल संघटना सर्वांनी सोबत असले पाहिजे. पक्षाच्या अजेंड्यावरच सर्वांनी काम केले पाहिजे. लोकसभेची लढाई जिंकायची आहे हा संकल्प घेऊनच जा. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नोटबंदी, जीएसटीची अंमलबजावणी, अचानक लावलेला लॉकडाऊन, शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्ध आणि भ्रष्टाचार या पाच मुद्द्यांमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी सातत्याने भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची असल्याचे सांगत असतात.
डरेंगे तो मरेंगे, लडेंगे तो जितेंगे खर्गे
देशातील लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र या, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. शिबिरास ऑनलाइन उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले. 'डरेंगे तो मरेंगे, लडेंगे तो जितेंगे' असा कानमंत्रही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.