लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बौद्धकालीन लेण्यांचा देशातील सर्वात मोठा गट असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील लेणी समूह आणि शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे केली आहे.
बापट म्हणाले, की जुन्नर शहर आणि परिसराला सुमारे अडीच हजार वर्षांचा प्राचीन इतिहास लाभला आहे. हा परिसर सातवाहन काळातील ग्रीक आणि रोमन साम्राज्याची राजधानी होती. हे डेक्कन कॉलेजच्या उत्खननातून समोर आले आहे. नाणेघाट ते पैठण हा सातवाहनकालीन व्यापारी मार्ग होता. अशा रोमांचकारी इतिहासाची साक्ष देणारे अनेक पुरावे या ठिकाणी आजही आढळतात. हा रोमांचकारी इतिहास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यासाठी या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत असून, त्यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला आमचा ऊर्जास्रोत आहे. या किल्ल्याच्या विकासासाठी देखील निधी द्यावा. किल्ल्यावरील अंबरखाना इमारतीतील प्रस्तावित सातवाहनकालीन वारसा संग्रहालयासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी केल्याचे बापट यांनी सांगितले.