पुणे :एअर इंडियानेपुणे-अहमदाबाद पहिली थेट विमानसेवा २० ऑगस्टपासून सुरू करत असल्याची घोषणा केली. भारतातील ही दोन स्मार्ट शहरे आहेत. वाणिज्य आणि शैक्षणिक केंद्रे म्हणून ती वेगाने विस्तारत आहेत. पुणे व अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान एअर कनेक्टिव्हिटीची असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी एअर इंडियाने या नव्या मार्गाचा समावेश केल्याचे सांगितले आहे.
एअर इंडियाचे विमान एआय ०४८१ अहमदाबाद विमानतळावरून सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी निघून पुणे विमानतळावर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. त्याचप्रमाणे विमान एआय ०४८२ पुणे विमानतळावरून दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी निघून अहमदाबाद विमानतळावर दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. या दोन शहरांदरम्यान हवाई प्रवासाला लागणारा अंदाजे वेळ ८५ ते ९५ मिनिटांचा असेल.
एअर इंडियाचे एमडी व सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले, महाराष्ट्र आणि गुजरात महत्त्वाची राज्ये आहेत. एअर इंडियाच्या देशांतर्गत कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा केली जात आहे. येत्या काही महिन्यांमध्ये आमची अजून विमाने सेवेत दाखल होतील. त्यामुळे नवीन ठिकाणी विमान सेवा सुरू होईल.’’
एअर इंडियाच्या नॅरोबॉडी ताफ्यामध्ये सध्या ७० एअरक्राफ्ट्स असून त्यापैकी ५४ सध्या सेवा सक्षम आहेत. उर्वरित १६ एअरक्राफ्ट्स २०२३ च्या सुरुवातीच्या महिन्यांपर्यंत टप्प्याटप्प्याने सेवेत येतील, अशी माहिती देखील एअर इंडियातर्फे देण्यात आली.