.....................................
दीपक मुनोत/लोकमत न्यूज नेटवर्क
..................,,................,,,
पुणे: क्रिकेट या भारतातील लोकप्रिय खेळाशी नामसाधर्म्य असणाऱ्या किरकटवाडीतील युवकांना गावात क्रिकेट तर सोडा मात्र इतर खेळांसाठीही मैदान नाही, याचे गावकऱ्यांना मोठे शल्य आहे.
सिंहगड रस्त्यावर नांदेड सिटीजवळ असणाऱ्या किरकटवाडीने गेल्या दहा-बारा वर्षांत आपली कूस बदलली आहे. नागरीकरणामुळे गावची लोकसंख्या वाढत असतानाच ग्रामपंचायतीची मर्यादा गावाला होती. आता ती दूर होऊन, महानगराचे उपनगर म्हणून किरकटवाडी ओळखली जाणार याचा ग्रामस्थांना आनंद असून विलिनीकरणाचे सर्वच थरातून स्वागत झाले आहे.
पुणे शहराच्या आजूबाजूला जी काही छोटीमोठी गावं आहे, त्यापैकी शेतीयोग्य अशी जमीन ज्या गावाने राखली आणि टिकवली ते किरकिटवाडी गाव आहे. गावात नागरिकरण वाढत असतानाही शेती टिकून आहे. तथापि गाव शहरीकरणामुळे बकाल होऊ नये म्हणून गावकऱ्यांनीच, आम्हाला महापालिकेत विलीन करा, या मागणीसाठी याआधी कायदेशीररीत्या प्रयत्न केलेले आहेत. यावरून गावकऱ्यांची जागरुता लक्षात येते.
गावात अगदी मध्यभागी विरंगुळ्यासाठी उद्यानाची सुविधा करण्यात आली आहे. त्याठिकाणी बसण्यासाठी जागा आणि आजूबाजूला हिरवळ असल्याने दुपारी गावातील जेष्ठ नागरिकांचा गप्पांचा फड तिथे रंगतो. ʻलोकमतʼ प्रतिनिधींबरोबर बोलताना या कट्ट्यावरील काहीजण म्हणाले, पावसाळ्यात उद्यानाशेजारी असलेल्या ओढ्याला पूर येतो तेव्हा मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. याआधीच्या पूरात गावातील दुचाकी आणि इतर वाहनं वाहून गेली होती. आता भविष्यात महापूरात आमच्या गावात आणखी नुकसान होऊ नये त्यादृष्टीने पावलं उचलली गेली पाहीजेत.
गावात वेगवेगळ्या कलाप्रकारात कला सादर करणारे अनेक कलाकार आहेत. राष्ट्रीय तसेच राज्याच्या वेगवेगळ्या मंचावर त्यांनी आपली कला सादर करून गावाच्या अभिमान आणखी वाढवला आहे. आम्हाला सरकारकडून मदत मिळतेच, पण ग्रामपंचायत पातळीवरही मोठे सहकार्य मिळते असे नाट्यप्रकारात भाग घेणारे गावातील तरुण सांगतात.
त्याचबरोबर गावात खेळण्यासाठी प्रशस्त मैदान नसल्याने तरुणांनी खेळायचं कुठे? गावातील तरुणांमध्ये खेळाबाबत मोठी गुणवत्ता आहे. पण त्याला वाव कधी मिळेल? असा प्रश्न विचारताना महापालिकेने आम्हाला खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी तरुण खेळाडूंनी केली.
...........................................
सरपंच म्हणून मला अनेक प्रश्न सोडवता आले याचा आनंद आहे. महापालिकेतर्फेही गावात अनेक प्रकल्प राबवले जाईल या अपेक्षेनेच आम्ही गावच्या विलिनीकरणाचे स्वागत करतो.
-गोकुळ करंजावणे
सरपंच
____________________________________
गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग राहतो. शेतातील भाजीपाला विक्रीसाठी महापालिकेने भाजीमंडईची व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास मोठा रोजगार उपलब्ध होईल, नागरिकांचीही सोय होईल.
-संतोष गाडेकर, ग्रामस्थ