कल्याण : शहरातील वाहतूककोंडीवर मात करण्याबरोबरच स्मार्ट प्रवासासाठी कल्याणमध्ये हवाई रिक्षा सुरू करण्याची घोषणा मंगळवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. भारतात ही संकल्पना दुर्मीळ असली, तरी परदेशांत हवाई रिक्षा म्हणजेच पॉड टॅक्सी, पॉड रिक्षांद्वारे वाहतूक केली जात आहे.
केडीएमसीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांमधील सिटी पार्कचे भूमिपूजन मंगळवारी ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी हवाई रिक्षाची घोषणा केली. पॉड रिक्षा सध्या सिंगापूरमध्ये धावत आहेत. ही रिक्षा चालकविरहित असून चार ते सहाआसनी असते. एखाद्या स्काय ट्रॉलीप्रमाणे ती चालते. उन्नत (एलिव्हेटेड) मार्गाला समांतर अथवा त्याच्या खालून तारेला लटकलेल्या अवस्थेत ही रिक्षा पुढे जाते. उन्नत मार्गावर तिचे थांबे असतात. रिक्षात संगणकीय प्रणाली असून, त्यावर स्थानकांची यादी येते. यादीवरील इच्छित स्थळाचे बटण दाबल्यावर तेथे रिक्षा थांबते. दिल्ली ते गुडगावदरम्यान ही रिक्षासेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच धर्तीवर ठाण्यात प्रयोग होणार आहे. ठाण्यात दोन मार्गांवर ही रिक्षा धावणार होती. आता पाच मार्ग निश्चित केले असून त्याच्या हालचाली सुरू आहे.केडीएमसीने १४०० कोटींचा स्मार्ट सिटी प्रकल्प हाती घेतला आहे. २५ प्रमुख प्रकल्प स्मार्ट सिटीअंतर्गत होणार आहेत. त्यातील सिटी पार्कच्या कामाचे भूमिपूजन झाले. रेल्वेस्थानक परिसराचा विकास व कल्याण, डोंबिवली खाडी परिसराचा विकास, यावर प्रथम भर दिला गेला आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते १८ डिसेंबरला झाले आहे. कल्याणमध्ये पश्चिमेला दुर्गाडी ते कृषी उत्पन्न बाजार समिती हा मार्ग मेट्रोचा आहे. या मार्गाच्या खालोखाल अथवा समांतर हवाई रिक्षा सुरू केली जाऊ शकते. भिवंडी-कल्याण-शीळ हा उन्नतमार्गही विकसित करणे प्रस्तावित आहे. कल्याण ते शीळ मार्गाचे सहापदरीकरण, उन्नतमार्ग आणि उन्नतमार्गाच्या खालोखाल अथवा समांतर हवाई रिक्षा सुरू करण्याची शक्यता आहे.संकल्पनेबाबत अनभिज्ञतावाहतूककोंडीवर हवाई रिक्षा उपाय होऊ शकतो. त्यामुळे ठाकरे यांची घोषणा स्वप्नवत नसून प्रत्यक्षात येऊ शकते. परंतु, त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. दरम्यान, हवाई रिक्षाच्या संकल्पनेविषयी परिवहन अधिकारी व रिक्षा-चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.