लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात या अंतर्गत राज्य सरकारने सुरू केलेल्या महाडीबीटी पोर्टलवर जिल्ह्यात १ लाख ३० हजार ६६८ अर्ज आले आहेत. त्यातील ६५ हजार अर्ज फक्त शेती अवजाराच्या योजनेसाठी असून त्यातही ट्रॅक्टरला सर्वाधिक पसंती आहे.
शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल का, याविषयी कृषी विभागात साशंकता होती, मात्र ती वृथा ठरवत विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. संकेतस्थळावर आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, त्याची जोडणी असलेले प्रमाणपत्र व शेतीसंबधीची अन्य कागदपत्रेही अर्जासोबत अपलोड करायची होती. ते केल्याशिवाय अर्ज सबमिटच होणार नव्हता, त्यामुळे पोर्टलवर प्राप्त झालेले सर्व अर्ज पात्र असतील असा अंदाजही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
प्राप्त अर्जांपैकी ६५ हजार २५७ अर्ज फक्त विविध प्रकारची शेती अवजारे घेण्यासाठी म्हणून केलेले आहेत. त्यातही सर्वाधिक म्हणजे ५२ हजार ८७९ अर्ज ट्रॅक्टरसाठी आहेत. त्यातलेही ३० हजार २१० अर्ज ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसाठी आहेत. २२ हजार ६६९ अर्ज फक्त ट्रॅक्टरसाठी आहेत. पीक कापणी यंत्र, पीक मळणी यंत्रेही हवी आहेत. शेती अवजारांच्या योजनांसाठी जिल्हास्तरावर ४ कोटी ४० लाख रूपये मंजूर झालेले आहेत. जास्त अर्ज असल्याने आता यातून सोडत काढण्यात येईल. सोडतीमधून निवडल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांनी खरेदीच्या पावत्या सादर केल्यानंतर अनुदान रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा होणार आहे.