युगंधर ताजणे- पुणे : विमानाने प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना आपल्या सीटवर झुरळ आढळल्याने त्यांनी संबंधित विमान कंपनीकडे तक्रार केली. मात्र त्या कंपनीच्या व्यवस्थापन विभागाने प्रवाशाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. यामुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन कराव्या लागणाऱ्या प्रवाशांना ग्राहक मंचाने दिलासा दिला आहे. तसेच इंटरग्लोब एव्हिशन लिमिटेड (इंडिगो)व एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांना दोन्ही तक्रारदारांना विमान प्रवासा ८ हजार ५७४ रुपयांची रक्कम, मानसिक व शाररीक तक्रार खर्चापोटी ५० हजार रुपये देण्याचा आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य क्षितीजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांच्या मंचाने दिला. स्कंद असीम बाजपेयी (रा. शीला विहार कॉलनी, कोथरुड), सुरभी राजीव भारद्वाज (रा. वनराजी हाईटस, कोथरुड) यांनी याप्रकरणी ग्राहक मंचाकडे दाद मागितली. तक्रारदार यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी पुणे ते दिल्लीच्या विमानप्रवासासाठी ८ हजार ७५४ रुपये देऊन इंडिगो या कंपनीचे तिकीट बुक केले. यानंतर ३१ डिसेंबर रोजी तक्रारदार प्रत्यक्षात विमानातून प्रवास करताना त्यांना आपल्या आसनावर झुरळ असल्याचे दिसून आले. त्यांनी ही बाब कंपनीच्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आणून देत त्यांना तात्काळ स्वच्छता करण्यास सांगितले. मात्र त्यावर त्यांनी तक्रारदारांना आपल्या मोबाईलवर संदेश आणि इमेलव्दारे सविस्तर तक्रार नोंदविण्याची सूचना केली. यानंतर देखील स्वच्छतेविषयी कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. प्रवाशाने तक्रारीबद्द्ल नोंदणी पुस्तिकेची मागणी केली असता ती देण्यास टाळाटाळ केली. दिल्ली येथे विमान पोहचल्यानंंतर तक्रारदारांनी झुरळाचे फोटो कंपनीच्या प्रतिनिधींना दाखवल्यानंतर त्यांनी कारवाई न करता पुन्हा मेलव्दारे तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार १ जानेवारी २०१९ रोजी मेलद्वारे कंपनीकडे तक्रार केली. यावर ४ जानेवारीला कंपनीकडून पेस्ट कंट्रोल व्यवस्थित केले नसल्याने असुविधा झाल्याचे कारण दिले. पुढे कंपनीने झुरळांचा प्रादुर्भाव बंद करता येणार नसल्याचे मेलव्दारे सांगितले. मात्र यासगळयात तक्रारदारांना मोठ्या मानसिक व शाररीक त्रास झाल्याचे त्यांनी मंचाला दिलेल्या अर्जात म्हटले आहे. विमान प्रवासा दरम्यान स्वच्छ निर्जतुंक व जबाबदारीने सेवा सुविधा पुरविणेबाबत कंपनीने तक्रारदार यांच्यासमवेत करार केला होता. कंपनीकडून कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात टाळाटाळ करणे ही बाब मंचाकडून विचारात घेतली. तक्रारदार बाजपेयी यांचे हाताचे दुखणे व भारद्वाज यांना संसर्गजन्य आजार असताना देखील त्यांना कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे मानसिक त्रासाला सहन करावा लागला. यासगळयाची संबंधित यंत्रणेकडून दखल घेतली गेली नाही.
..............
* जाब देणारे इंडिगो आणि एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी दोन्ही तक्रारदारांना एकत्रितपणे विमान प्रवासाची ८ हजार ५७४ रक्कम तक्रार दाखल दिनांक ३० मार्च २०१९ पासून ९ टक्के व्याजासहित परत करावेत. आदेश प्राप्तझाल्यानंतर तीस दिवसांच्या आत तक्रारदारांना शाररीक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. याची भरपाई म्हणून ५० हजार रुपये एकत्रित देण्याचा आदेश मंचाने दिला आहे.
* झुरळाचे विमानामध्ये असणे ही गंभीर बाब नसून त्यामुळे तक्रारदारास प्रवासादरम्यान कोणताही त्रास झाला नाही. यामुळे तक्रारदारांची तक्रार गंभीर नाही, असे जाब देणाऱ्या कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच जाब देणाऱ्यांच्या इमेलची तपासणी केल्यानंतर त्यांनी तक्रारदारास सेवा पुरविताना उदभवलेल्या त्रुटीपूर्ण सेवेची कोणतीही दखल घेतली नाही. हे मुद्दे आदेशात महत्वाचे ठरले.