- लोकमत न्यूज नेटवर्कखळद : पुरंदर विमानतळाबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग काही राजकीय लोकांनी आरंभला आहे. मात्र त्यात तथ्य नसून विमानतळ पुरंदरमध्येच होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे. ‘पुरंदर विमानतळाची जागा बदलणार’ म्हणून काही वर्तमानपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर पुरंदरसह पश्चिम महाराष्ट्रात चर्चांना उधाण आले होते. त्यातच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया न आल्यामुळे आणखी तर्कवितर्कांना उधाण आले होते. याबाबत मंत्री शिवतारे म्हणाले, की आठवडाभर चाललेल्या गावगप्पा मी त्रयस्थपणे पाहत होतो. जनतेतून आणि सर्व स्तरातून येणाऱ्या प्रतिक्रियांचे अवलोकन करीत होतो. काही पुढाऱ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असून विमानतळ रद्द झाल्याचे स्वयंघोषित करून ते लोकांनाही भ्रमित करत सुटले आहेत. कधी काळी ठार दुष्काळी असलेला पुरंदर तालुका आता प्रगतीच्या वेगळ्या टप्प्यावर जाणार, हे जाणवल्यामुळे काहींच्या पोटात भलताच गोळा उठला आहे. ज्या खेड तालुक्यात सुरुवातीला विमानतळ नियोजित होते ते लोक आज पश्चात्ताप करीत आहेत. विमानतळ प्राधिकरणाला नाना प्रकारे पटवण्याचा प्रयत्न येथील लोकांनी करून पाहिला. पण सरकार आता पुरंदरवर ठाम आहे. पुण्यातील विमानतळ हे संरक्षण विभागाचे आहे. या विमानतळावरील उड्डाणे आणि लँडिंगला पुरंदर विमानतळामुळे काही अडचण आहे का नाही, याबाबतचे तांत्रिक स्पष्टीकरण डीपीआरमध्ये देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याचा अंतर्भाव करावा, गरज भासल्यास फेरसर्वेक्षण करावे, असे निर्देश संरक्षण मंत्रालयाचे आहेत. त्यामुळे थेट रद्दच्या गप्पा म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला टोलाविमानतळामुळे जगभरचे कारखानदार, गुंतवणूकदार, व्यापारी आणि बहुराष्ट्रीय कंपन्या पुरंदरकडे डोळे लावून आहेत. हे नुसते विमानतळ नाही तर आर्थिक आणि भौतिक विकासाचे महाद्वार आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लाखो लोकांना त्यातून रोजगार मिळणार आहे. तालुक्याची प्रगती होत असताना अशा वावड्या उठवणाऱ्या लोकांची तालुक्याच्या विकासावर किती श्रद्धा आहे, ते यातून स्पष्ट होते, असा टोलाही विजय शिवतारे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला.
विमानतळ पुरंदरमध्येच होणार
By admin | Published: July 16, 2017 3:39 AM