पुणे : गेल्या काही वर्षांत विधानसभा निवडणूक पहिल्यादाच काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व मनसे हे प्रमुख पाच पक्ष स्वतंत्रपणे लढवीत आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात अटीतटीची लढत असल्याने उमेदवाराच्या मतदारसंघातील विकासकामांचे भांडवल केले जात आहे; परंतु राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यातून शहराचे मेट्रो, बीआरटी, पीएमआरडीएचे प्रश्न गायब झाले आहेत.विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईपर्यंत प्रत्येक राजकीय पक्षाकडून शहरातील प्रमुख प्रश्नांचा वचननामा तयार करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यानंतर अचानक भाजप-शिवसेना युती व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटली. त्यामुळे शहरातील आठही मतदारसंघांत पंचरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील प्रश्न दुर्लक्षित होऊन मतदारसंघनिहाय उमेदवारांनी वचननामे तयार केले. त्यामध्ये मतदारसंघातील स्थानिक प्रश्न व विकासकामे मांडली जाऊ लागली आहेत.सध्याची विधानसभा निवडणूकही मतदारसंघनिहाय स्थानिक प्रश्नावर लढविली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या परंपरांगत मतदानाला धक्का लागण्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणूक महापालिका अथवा ग्रामपंचायतीसारखी स्थानिक उमेदवारांच्या विकासकामांवर व व्यक्तिमत्त्वावर होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
अजेंड्यावरून मेट्रो, बीआरटी गायब
By admin | Published: October 07, 2014 6:13 AM