पुणे : प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांच्या तालावर लंडन येथील प्रसिद्ध ग्रॅँड फिल हार्मोनिक आॅर्केस्ट्राचा साज अनुभवण्याची संधी संगीतरसिकांना मिळणार आहे. येत्या ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६़३० वाजता म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे हा अविस्मरणीय फ्युजन सोहळा रंगणार आहे.तब्बल सहा वर्षांनी पुण्यात होत असलेल्या अजय-अतुल लाईव्ह इन कॉन्सर्टचे आयोजन गोल्डन पिरॅमिडने केले आहे. ‘लोकमत’च्या सहयोगाने या भव्य सोहळ्याचा आहे. तसेच मिर्ची लाइव्ह (रेडिओ मिर्ची) यांचा सहयोग आहे़ अजय-अतुल यांची तब्बल ३२ गाणी ऐकण्याची आणि अनुभवण्याची संधी संगीत रसिकांना मिळणार आहे.अतुल गोगावले म्हणाले, ‘‘रसिकांना कायमच काही तरी नवीन देण्याची आमची धडपड असते. ‘सैराट’च्या यशानंतर संगीतप्रेमींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. त्यातील पुढचे पाऊल म्हणून ग्रॅँड फिल हार्मोनिक आर्केस्ट्रा घेऊन पुण्यात येत आहोत. संगीतरसिकांना ही अतुलनीय भेट ठरणार आहेत. तब्बल ३० कलाकारांचा यामध्ये समावेश आहे.’’अजय गोगावले म्हणाले, ‘‘आजपर्यंत आम्ही अनेक वाद्यांचा वापर केला आहे. मात्र, आॅर्केस्ट्रा हा केवळ स्ट्रिंग म्हणजे व्हायोलिन, व्हिवोला, चेलो, डबल बास ही इन्स्ट्रुमेंटस नाहीत, तर त्या व्यतिरिक्तचीही वाद्ये आहेत. यातून संगीताचा एक संपूर्ण अनुभव तयार होत असतो.’’या लाइव्ह कॉन्सर्टसाठी अजय- अतुल यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. अतुल गोगावले म्हणाले, ‘‘आमची गाणीही प्रेक्षकांना पाठ आहेत. आमच्यापेक्षा त्यांचे ऋणानुबंध या गाण्यांशी जास्त जुळलेले आहेत. त्यामुळे त्यांना अगदी जिवंत अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक गाण्याची अत्यंत कसून तयारी केली जात आहे. त्यातील नवीन जागा शोधण्याचाही प्रयत्न आहे. यातून गाणे अधिक निखरून येईल.’’अजय-अतुल गेल्या काही दिवसांपासून या लाइव्ह इन कॉन्सर्टसाठी सराव करीत आहेत. दीडशेहून अधिक गायक-वादकांचा ताफा आपल्या मातीतील फ्युजन आणि ग्रॅँड फिल हार्मोनिक आॅर्केस्ट्रा यांचे अभूतपूर्व फ्युजन या संगीतसोहळ्यात रसिकांना अनुभवण्यास मिळणार आहे.त्याचबरोबर ‘नटरंग’पासून ते ‘अग्निपथ’, ‘पीके’, ‘ब्रदर्स’, ‘लई भारी’ आणि अर्थातच ‘सैराट’मधील गाणीही ऐकता येणार आहेत. तब्बल साडेतीन तासांचा हा सोहळा अजय- अतुल यांच्या लौकिकाला साजेसा भव्य होण्यासाठी तितकेच भव्य व्यासपीठ शिवछत्रपती क्रीडा संकुलात उभारले जात आहे. ४० ते ५० हजार प्रेक्षकांना हा सोहळा अनुभवता येणार आहे.अधिक माहिती वतिकीट विक्रीसाठी संपर्क९०७५०५००९९/ ९०७५०६००९९पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील५० हून अधिक केंद्रांवरप्रवेशिका उपलब्ध आहेत.
अजय-अतुलच्या तालावर पुणेकर थिरकणार; लंडनच्या ग्रॅँड फिल हार्मोनिक आॅर्केस्ट्राचा आवाज देशात प्रथमच घुमणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 5:55 AM