पुणे : ससून रुग्णालय व बी. जे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या बदलीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी गुरुवारी (दि. १३) मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय व ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारला. दरम्यान, डॉ. चंदनवाले यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे.डॉ. चंदनवाले हे ससूनमध्ये ते दि. १३ मे २०११ पासून अधिष्ठाता पदावर कार्यरत होते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाने त्यांच्या बदलीचा आदेश काढला होता. त्यांनी तातडीने जे. जे. रुग्णालयात पदभार स्वीकारावा, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. पण रुग्णालयातील विद्यार्थी, डॉक्टर, कर्मचारी संघटनांनी त्यांच्या बदलीला जोरदार विरोध केला. त्यामुळे शासनाने काही दिवसांतच बदलीच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली. त्यानंतर रुग्णालयात अधून-मधून त्यांच्या बदलीविषयी सातत्याने चर्चा होत होत्या. काही दिवसांपूर्वीच शासनाकडून त्यांना जे. जे.मध्ये पदभार घेण्याच्या आदेश आले होते. त्यानुसार त्यांंनी गुरुवारी (दि. १३) पदभार स्वीकारला.मागील साडेसात वर्षांमध्ये त्यांनी रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. या काळात त्यांनी वेगवेगळ्या कामांसाठी अध्यापक, डॉक्टर व सहकाऱ्यांच्या टीम्स तयार केल्या. प्रामुख्याने सामाजिक दायित्व (सीएसआर), खासगी व लोकसहभाग (पीपीपी) या माध्यमातून निधी उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आतापर्यंत त्यांनी ‘सीएसआर’च्या माध्यमातून जवळपास १०० कोटी रुपयांचा निधी उभा करून रुग्णालयाला अत्याधुनिक स्वरूप दिले. त्यांनी रुग्णालयामध्ये मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध केली.ससून रुग्णालयामध्ये सीएसआरच्या माध्यमातून अनेक अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या आहेत. केवळ रुग्णसेवा हीच भूमिका ठेवून काम केले. उर्वरित अपूर्ण राहिलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत. रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळावी, हीच अपेक्षा आहे. जे. जे. रुग्णालयातही याच भूमिकेतून काम करू.- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय, मुंबईमहाराष्ट्रात अद्याप एकाही शासकीय रुग्णालयामध्ये प्रत्यारोपणाची सुविधा नाही. अवयवदानामध्ये ससून रुग्णालय आघाडीवर आहे. ससून रुग्णालयाला स्वायत्तता दर्जा मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे चंदनवाले यांच्या बदलीमुळे ‘सीएसआर’मधून होणाºया कामांना खीळ बसण्याची शक्यता रुग्णालयांमध्ये व्यक्त केली जात आहे.
ससूनचे अधिष्ठाता अजय चंदनवाले यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 2:34 AM