नारायणगाव : एका अपघातात मणक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे गेली पंधरा वर्षे अंथरुणाला खिळून असणारे शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया विभागाचे सरचिटणिस अजय हिंगे आता हालचाल करू शकणार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजय यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने (१० ऑगस्ट) ऑटोमॅटिक व्हीलचेअरची अनोखी भेट दिली आहे. या चेअरच्या माध्यमातून अजय यांना हालचाल करून आपल्या पायावर देखील उभे राहू शकतील.
कायमचे दिव्यांगत्व येऊन देखील अजय हे परिस्थितीला शरण न जाता जिद्दीने संघर्षमय जीवन व्यतीत करीत असताना त्यांच्या या लढाऊ वृत्तीची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी घेतली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिरूरला आले की अजय यांची आवर्जून भेट घेतात. खासदार सुप्रिया सुळे या देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांच्याशी संपर्क साधत असतात.
अजय हिंगे पाटील म्हणाले, पंधरा वर्षांपूर्वी बारावी पास झाल्यानंतर रांजणगाव एमआयडीसीमध्ये नोकरी करीत असताना २० जून २००६ रोजी घरी जात असताना भीषण अपघात होऊन मणक्याला गंभीर इजा होऊन तीन महिने पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अपघातामुळे कायमस्वरूपी झोपून रहावे लागेल हा एकच मार्ग उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितला. त्यानंतर हताश अवस्थेत छताकडे डोळे लावून पडून राहत होतो. कायमचे दिव्यांगत्व आल्यामुळे मी काहीसा निराश झालो होतो. संपूर्ण आयुष्यभर झोपूनच राहावे लागणार या चितेंत असताना ऑटोमेटिक व्हीलचेअर वाढदिवसाची भेट मिळाल्याने जणू काही माझा पुनर्जन्मच झाल्याचा भास होत आहे.
--
चौकट १
आता प्रतीक्षा खासदार कोल्हे यांच्यासमवेत सेल्फीची...!
माझ्या वाढदिवसाला इतकी अनमोल भेट देणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना मला या व्हीलचेअरसोबत भेटायचे आहे. त्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि त्यांच्यासोबत एक सेल्फी पण घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांची अगदी आतुरतेने वाट पाहतोय, अशा आनंदी भावना अजय हिंगे पाटील यांनी व्यक्त केल्या.
चौकट २
अजय हिंगे आणि सुदर्शन जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडियाचे काम सांभाळणारे दोन खंदे वीर आहेत. हे वीर सोशल मीडियावर पक्ष, खासदार, आमदारांसह सर्व लोकप्रतिनिधींची विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवित असतात. त्यांचा उत्साह आणि कर्तव्यनिष्ठा कोणालाही भारावून टाकणारी अशी आहे. व्हीलचेअरच्या मदतीने सुदर्शन जगदाळे यांच्याप्रमाणेच ते पुन्हा आपल्या पायावर उभे राहतील, असा विश्वास आहे.
-डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर लोकसभा मतदारसंघ
140821\photo 1.jpg
खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून बर्थ डे गिफ्ट म्हणून मिळाली ऑटोमॅटिक व्हिल चेअर !