पुणे: पुणे शहर गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली. अजय तावरे हा ससून रुग्णालयाच्या Forensic Medicine And Toxicology विभागाचा प्रमुख आहे. तर डॉक्टर श्रीहरी हळनोर हा अपघात विभागात चीफ मेडिकल ऑफिसर आहे. श्रीहरी हळनोर याच्या विभागाने अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेतले. डॉक्टर अजय तावरे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. तरीही तावरेने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बाळाच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल करायला सांगितली. डॉक्टरांनी या प्रकरणात ३ लाख लाच घेतल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर आरोपी बाळाचे रक्त बदलण्याचा सल्ला डॉ. अजय तावरे यानेच बिल्डर विशाल अग्रवाल याला दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अजय तावरेच्या अडचणी अजूनच वाढत चालल्या आहेत. ससूनच्या वॉर्ड बॉयकडूनही या प्रकरणाबाबत धक्कदायक बाबी समोर आल्या आहेत. अजय चंदनवाले आणि अजय तावरे मला दारू आणायला सांगायचे असे ससूनला वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत असणाऱ्या नितीन सोनावणे यांनी टीव्ही ९ शी बोलताना सांगितले आहे.
माझे वडील आजारी होते, त्यानंतर वडिलांना हे सोडत नव्हते. तुम्हाला इथं काम करावं लागेल. तुमच्या मुलाला करायला सांग, असं सांगून आमच्यावर दबाव आणला. मी अपंग असूनही इथं कामाला सुरुवात केली. सर्व शासनाकडे मी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मी ३ वर्षे इथं काम करतोय. अजय तावरेने मला टॉयलेट बाथरूम धुवायला लावले. माझं कुटुंब उद्धवस्त झालाय, मला ६ वर्षे त्रास भोगावा लागलाय. मला कामावर घ्या, माझी उपासमारी होतीये, माझी मिसेस सोडून गेलीये. मी आत्मदहन करेल असा इशारा सोनवणे यांनी दिला आहे.
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
रक्त बदलल्यानंतर मद्यप्राशन केल्याचा अहवाल येणार नाही
विशाल याने डेड हाऊसचा शिपाई अतुल घटकांबळे याच्याद्वारे डॉ. तावरे याच्याशी संपर्क साधला, तसेच याप्रकरणी मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर डॉ. तावरेनेच विशाल याला रक्त बदलण्याचा सल्ला दिला. रक्त बदलल्यानंतर मद्यप्राशन केल्याचा अहवाल येणार नाही. आणि पुढे केसला देखील फायदा होईल, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी रक्त त्या बाळाचे घेतले. मात्र, ते तपासणीसाठी न देता दुसऱ्याच व्यक्तीचे रक्त घेऊन ते बाळाच्या नावाने दिले. तत्पूर्वी डॉ. तावरे आणि विशाल अग्रवाल याच्याशी आर्थिक बोलणे झाल्यानंतर लागेचच डॉ. श्रीहरी हाळनोर याला रक्त बदल व चाचणीची पुढची प्रक्रिया पार पडण्यास सांगितले. त्याबदल्यात शिपाई अतुल याच्यामार्फत ३ लाख रुपये घेतले.