हरलो म्हणून खचून जायचं नाही, हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिले : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 04:51 PM2021-01-27T16:51:36+5:302021-01-27T16:51:55+5:30
अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने मालिका जिंकली. या मालिकेत भारतीय संघानं केलेल्या कामगिरीचं सगळीकडे कौतुक होत आहे.
पिंपरी: अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने मालिका जिंकली. या मालिकेत भारतीय संघानं केलेल्या कामगिरीचं सगळीकडे कौतुक होत आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.ऑस्ट्रेलियन संघाविरूद्ध अत्यंत वाईट हरलो होतो. पण, हरलो म्हणून खचून जायचं नाही, हे मराठमोळ्या महाराष्ट्राचा सुपुत्र क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने दाखवून दिले आहे. भारतीय संघात बदल करून नवीन खेळाडूंना संघात स्थान दिले. त्यांनी जिद्द दाखवली आणि ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केले. हरलो म्हणून खचून जायचं नाही, हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने दाखवून दिले असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये माजी विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राजू मिसाळ, नाना काटे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असून, त्याला आगळं-वेगळं महत्व प्राप्त करून देण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे. त्यांचा राजकीय क्षेत्राशी संबंध पण, त्यांनी कबड्डी, खो-खो, कुस्ती, क्रिकेट या खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम केले. अडचणी सोडविल्या, खेळाडूंना चांगलं मानधन कसे मिळेल, सर्वसामान्य कुटुंबातील गोलंदाज, फलंदाज, अष्टपैलू खेळाडू यांना संधी कशी मिळेल हे सर्व त्यांनी पाहिले,”
................
अजित पवार म्हणाले, “क्रिकेट हा खेळ सर्वांना आपलासा वाटतो. मध्यंतरी ऑस्ट्रेलियाविरोधात आपण अत्यंत वाईट हरलो. त्याच प्रत्येक भारतीयाला दुःख झालं. परंतु, हरलो म्हणून खचून जायचं नाही. भारतीय संघात बदल झाले. नवीन खेळाडू घेतले. त्यांनी जिद्द दाखविली. आयपीएलमधून देखील नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आहे. काही जणांनी क्रिकेटला स्वतःचं करिअर केलं. त्यात, धोनी, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रवि शास्त्री यांची उदाहरणे समोर आहेत. पुढे देखील आणखी दर्जेदार खेळाडू निर्माण होतील. महाराष्ट्रात, पिंपरी-चिंचवड शहरात खेळाडू घडावेत. त्यांनी महाराष्ट्राच, देशाचं प्रतिनिधित्व करावे.