'साहेबां'च्या एका कॉलनंतर अजितदादा बारामतीमधून मुंबईसाठी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 02:51 PM2019-12-06T14:51:25+5:302019-12-06T15:00:55+5:30
उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचेच नाव निश्चित झाल्याची चर्चा...
बारामती : राज्यातील सत्ताबदलानंतर बारामती शहरात प्रथमच अजित पवार गुरुवारी(दि ५) त्यांच्या सहयोग येथील निवासस्थानी मुक्कामी पोहचले होते.आज सकाळी पवार यांचे कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत देखील केले.त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती .मात्र, पवार आज बारामती दौरा अचानक अर्धवट सोडून तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले.त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आल्याने ते मुंबईला रवाना झाल्याची चर्चा होती.
उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचेच नाव निश्चित झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. त्यानंतर पवार यांना अर्थ किंवा गृह खाते मिळणार असल्याची चर्चा रंगली होती.मात्र, अधिवेशनानंतरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याने बारामतीकरांना त्यादिवसाची प्रतीक्षा होती.
काल अचानकच अजितदादा बारामती येथील निवासस्थानी पोहचले. सकाळी सात वाजल्यापासुनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. विविध कामे मार्गी लावण्याबाबत त्यांनी सुचना केल्या.यावेळी शहरातील कार्यकर्ते,नागरीकांनी त्यांची भेट घेण्यासाठी,शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.यावेळी सर्व विभागाचे वरीष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसह, सर्व संस्थांचे प्रमुख पवार यांच्या भेटीसाठी आवर्जुन उपस्थित होते . येथील दौऱ्यादरम्यान, बारामती नगरपालिकेच्या नगरसेवकांसोबत त्यांची बैठक ठरली होती, त्यानंतर सोमेश्वर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत पवार चर्चा करणार होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर ही बैठकीची तयारी करण्यात आली होती.
मात्र, संपुर्ण दौरा अर्धवट सोडुन आज सकाळी मुंबईला निघून गेल्याने विविध चर्चा रंगल्या. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरु झाल्याने तातडीने ते मुंबईला रवाना झाल्याची यावेळी प्रामुख्याने चर्चा रंगली. एक फोन आल्यानंतर पवार तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आल्याने अजितदादा तातडीने मुंबईला गेल्याची चर्चा होती.