Ajit Pawar: आदरणीय दादा, बरे आहात ना? तुमचं नेमकं चाललंय तरी काय? निनावी पत्रातून अजितदादांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 01:11 PM2024-09-12T13:11:04+5:302024-09-12T13:11:46+5:30
‘माईक चालू राहू दे, आपलं सगळं उघड असतं’ असं जाहीरपणे सांगणारे आमचे कणखर दादा आम्हाला आता पहिल्यासारखे वाटत नाहीत
बारामती : आदरणीय दादा, बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय! काल आपल्या बारामतीत तुमच्या फोटोला काळे कापड लावलं गेलं. तेव्हा वाटलं आता लिहिण्याशिवाय पर्याय नाही. आज आमचं दुर्दैव आहे की नाव लपवून लिहावं लागतंय. कारण, नाव कळालं तर आम्हाला पुढे राजकारणात भविष्य राहील का, हा प्रश्न आम्हाला पडतोय. आजकाल तुमचं वागणं, बोलणं, सांगणं आणि ऐकणंसुध्दा पार बदलून गेलंय. तुम्ही टीव्हीच्या मुलाखतीत आणि जनसन्मान यात्रेच्या भाषणात ‘चूक’ झाली म्हणून जी काही जाहीर कबुली देताय, त्यामुळे तुमचं नेमकं चाललंय तरी काय, असा सवाल या निनावी पत्रामध्ये केला आहे.
असा प्रश्न माझ्यासारख्या लाखो दादाप्रेमी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. तोचं संभ्रम तुमच्या काल-परवाच्या बारामतीच्या सभेनं अधिकचं गडद केलाय. सभेत तुम्ही भरभरून बोललात. मात्र, तुमचा ‘सूर’ नेमका कळत नव्हता? तुम्ही खदखद व्यक्त करताय की सहानुभूती मिळवताय? किंवा भावनिक कार्ड खेळताय, की मन मोकळं करताय? हेचं नेमकं समजत नव्हतं आणि अजूनही समजलेलं नाही. कारण, आता तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा, रोखठोक आणि लढाऊ बाणा हरवला आहे की काय, अशी भीती वाटत राहाते. ‘तुझी ग्रामपंचायत आली का रे’ किंवा ‘माईक चालू राहू दे, आपलं सगळं उघड असतं’ असं जाहीरपणे सांगणारे आमचे कणखर दादा आम्हाला आता पहिल्यासारखे वाटत नाहीत. सध्या तुम्ही फार चिडचिड करताय. राग, संताप व्यक्त करताय. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून मी एकटाचं नव्हे, तर आपले सगळे जिवाभावाचे पदधिकारी, कार्यकर्ते आणि जवळची सगळी मंडळी पुरती घाबरून गेली आहेत. कारण, वैहिणींच्या पराभवाला तुम्ही सोडून आम्ही सगळेचं जबाबदार आहोत, अशी तुमच्या मनाची भावना झाली आहे, असे तुमच्या बोलण्यावरून सतत जाणवते. म्हणून तुमचं असं संशयाने पाहणे आता सहन होत नाहीये. जिवाची घालमेल होत आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.