अजित दादा माझा आवडीचा नेता, महायुतीतील प्रवेशानंतर शिवतारेंची बदलली भाषा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 02:59 PM2023-08-07T14:59:22+5:302023-08-07T16:02:33+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघात आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघात आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे.
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीही पुरंदर तालुक्यातील शिवसेना नेते विजय शिवतारेंवर जबरी टीका केली होती. तू यंदा कसा निवडून येतोस ते बघतोच मी, असे म्हणत अजित पवारांनी विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या भाषणात शिवतारेंना लक्ष्य केलं होतं. विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारेंचा पराभवही झाला. त्यामुळे, शिवतारे हेही अजित पवारांवर पलटवार करत होते. मात्र, अजित पवार महायुतीत येताच त्यांची भाषा बदलल्याचे दिसून येते. अजित पवार माझा आवडता नेता असल्याचं त्यांनी म्हटलंय.
बारामती लोकसभा मतदारसंघात आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघातील जेजुरी येथे आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी शासनाच्यावतीने विजय शिवतारे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यासाठी, ते ठाण मांडून कार्यक्रमस्थळी आहेत. विशेष म्हणजे यंदा प्रथमच ते अजित पवारांचं स्वागत करणार आहेत, त्यांच्यासमवेत स्टेजही शेअर करतील. त्यामुळे, मतदारसंघात चांगलीच चर्चा होतेय. काही महिन्यांपूर्वी अजित पवारांवर टीका करणारे शिवतारे आता अजित पवारांचे गोडवे गाऊ लागले आहेत. अजित पवार माझा आवडता नेता आहे, कर्तबगार नेता आहे, पण चुकीच्या पक्षात आहे, असं मी याअगोदरच बोललो होतो. आता, ते महायुतीमध्ये आल्यामुळे सरकारची ताकद वाढली आहे. आता, २०२४ पर्यंत कोणीही मुख्यमंत्री बनणार नाही, २४ पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे, ती संधी कधी मिळेल ते मिळेल. पण, नशिबातही ती संधी असावी लागते, असेही शिवतारेंनी म्हटले.
दरम्यान, विजय शिवतारेंनी यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यावेळी, अजित पवारांनी चांगलाच दम भरला होता. कुणाला मस्ती आली असेल तर ती जिरवण्याची ताकद आपल्यात आहे, अशा शब्दात अजित पवारांनी शिवतारेंना इशारा दिला होता. तर, शिवतारेंनीही अजित पवारांचा राज ठाकरे होणार, ना घर का ना घाट का? असे म्हणत पलटवार केला होता. मात्र, आज शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आज दोघेही एकाच मंचावर दिसणार आहेत.