"घटना घडत असतात"; स्वारगेट प्रकरणावर मंत्र्यांचे संतापजनक विधान, अजित पवारांनी पिळले कान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:25 IST2025-02-28T13:03:35+5:302025-02-28T13:25:30+5:30
स्वारगेट अत्याचार प्रकणावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना अजित पवार यांनी सल्ला दिला

"घटना घडत असतात"; स्वारगेट प्रकरणावर मंत्र्यांचे संतापजनक विधान, अजित पवारांनी पिळले कान
Pune Swargate Bus Stand Crime: पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला गुरुवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मात्र या सगळ्या प्रकरणावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट घटनेबद्दल बोलताना ती फोर्सफुली घडली नाही असं म्हटलं. कदम यांच्या विधानानंतर भाजपचे मंत्री संजय सावकारे यांनी अशा घटना घडत असतात, असं विधान केलं. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना केली आहे.
पुण्यातल्या स्वारगेट अत्याचार प्रकरणावरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेनंतर केलेल्या विधानाने नवा वाद उफाळून आला आहे. जी घटना घडली ती फोर्सफुली घडली किंवा स्ट्रगल झाला असं काही कळलं नाही. कारण १० ते १५ लोक त्या आवारात होते. त्यामुळे आरोपीला गु्न्हा करता आला, असं योगेश कदम म्हणाले. त्यानंतर वस्त्रोद्योग मंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी या घटनेबाबत असंवेदनशील विधान केलं.
"एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही, असं म्हणता येत नाही. देशात म्हणाल तर घटना घडत असतात. कारवाई सातत्यानं चालू राहते. महिला असो की पुरुष असो सगळे सुरक्षित राहिले पाहिजेत. फक्त महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, पुरुष नको असं नाही. सगळे सुरक्षित राहिले पाहिजेत या दृष्टीनं कुठलंही शासन प्रयत्न करत असते. गुन्हेगारीवृत्ती प्रत्येक ठिकाणी असते. गुन्हेगार असल्यानं या गोष्टी घडत असतात, शासन कारवाई करण्याचं काम करत असते," असं विधान संजय सावकारे यांनी केलं.
दोन्ही मंत्र्यांच्या वक्तव्यांनी वाद सुरु झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे असं म्हटलं. "बोलताना थोडसं तारतम्य सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. दोषीला अशा बातम्यांमधून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये ही खबरदारी घेतली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.