- दुर्गेश मोरे
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भेटीमुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. वास्तविक विकासकामांसंदर्भात ही भेट होती, असे जरी डॉ. कोल्हे सांगत असले तरी शिरूर लोकसभेवर अजित पवार गटाने सांगितलेला दावा, लोकसभा अध्यक्षांकडे केलेल्या याचिकेमध्ये कोल्हेंचे नाव वगळले यामुळे आगामी नव्या राजकीय समीकरणांचे संकेत देत आहे. दरम्यान, दुसरीकडे शिंदे गटाचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यापुढे अडचणी वाढल्या आहेत. ज्या कारणामुळे ते शिंदे गटात सहभागी झाले, त्याच मतदारसंघावर अजित पवारांनी दावा ठोकला आहे. जरी अजित पवार गटाकडून आढळराव-पाटील निवडणूक लढण्यास तयार असले तरी अजित पवार त्यासाठी इच्छुक नसल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपमध्ये सामील झाल्यापासून जिल्ह्यातील राजकारण बदलून गेले आहे. शिंदे-भाजपमधील अनेक नेत्यांची यामुळे गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात वर्चस्व राहण्यासाठी अजित पवार गटाचा लोकसभेमध्ये एकतरी खासदार असणे गरजेचे आहे. तसे पाहिले तर बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा करून कुटुंबकलह वाढवण्यास अजित पवार तयार नसल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे पुणे लोकसभा हा भाजपकडे आहे. तर शिंदे गटाकडे मावळ आहे. उरला प्रश्न तो शिरूरचा. शिरूर लोकसभेमध्ये खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, हडपसर आणि भोसरीचा काही भागांचा समावेश आहे. या ठिकाणी शिरूरचे आमदार अशोक पवार वगळता सर्व आमदार अजित पवार गटाचे आहेत, तर भोसरीचे आमदार महेश लांडगे हे भाजपचे आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला हा एकमेव मतदारसंघ सोयीस्कर असल्यानेच शिरूर लोकसभेसाठी अजित पवार आग्रही असून तो त्यांच्या पदरीही पडेल.
अजित पवार गटाकडून कोल्हेंना प्रस्ताव
भाजपला ज्या मतदारसंघात यश मिळवता आले नाही. त्यावर २०२० पासून विशेष लक्ष्य केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्रीय दौरे सुरू आहेत. शिवाय २०२० पासून खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपबरोबर जवळीकता वाढवली. त्यामुळे भाजपने तेव्हापासून बारामती आणि शिरूरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व्हे केला. दोन वेळा सर्व्हे केला. त्यामध्ये शिरूरमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनाच मतदारांनी पसंती दिली आहे. दरम्यान, डॉ. कोल्हे यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादीचे मंथन शिबिर यासह अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना जाणे टाळले होते. त्यामुळे अजूनपर्यंत ते कोणाकडून लढणार याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. इंद्रायणी मेडिसिटी आणि पुणे-नाशिक सेमी हायस्पीड ट्रेनसारखे डॉ. कोल्हे यांचे ड्रीम प्रकल्प अजूनही अडगळीत आहे. मध्यंतरी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी संवाद वाढवल्यानंतर या प्रकल्पांना गती मिळाली. परंतु आता गती कमी झाली आहे. भाजपने काही दिवसांपूर्वी तिसरा सर्व्हे केला. त्यामध्येही शिरूरमधील कोल्हेंची लोकप्रियता काही कमी झालेली दिसून आली नाही. दुसरीकडे अजित पवार यांनीही शिरूरमधून आमच्या गटातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव डॉ. कोल्हे यांना दिला असल्याचे अजित पवार गटाच्या एका निकटवर्तीयाने नाव न छापण्याचा अटीवर सांगितले. यासाठी भाजपही आग्रही राहील. तसे झाले तर ड्रीम प्रोजेक्ट सत्यात उतरणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता डॉ. कोल्हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आढळरावांची स्थिती ना घर का ना घाट का...
शिरूर लोकसभेची उमदेवारी मिळावी यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झाले. पण मूळ शिवसैनिक मात्र शिवसेनेबरोबरच राहिला. त्यानंतर आढळरावांनी विकासकामांचा धडाका लावला. ज्या वेळी भाजप आणि डॉ. कोल्हे यांची सलगी वाढल्याचे लक्षात येताच आपण राष्ट्रवादीतून लढू शकतो, असे सुतोवाच आढळराव पाटील यांनी केले होते. मात्र, सध्या राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा भाजपमध्ये आला आहे. त्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली. कारण शिरूरमध्ये येणाऱ्या सर्वच मतदारसंघात भोसरी आणि शिरूर वगळता अजित पवार गटाचे आमदार आहेत. खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्याबरोबर आढळरावांचे फारसे काही पटत नाही. निवडून आल्यानंतर होणारा कलह सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना चांगलाच माहीत असल्याने तेही त्यांना मदत करण्यास फारसे इच्छुक असतील असे नाही. उरला जुन्नर तालुका. त्या ठिकाणी आमदार अतुल बेनके ते थोडीफार मदत करतील, पण अजित पवार गटाचा उमेदवार नसेल तर. दुसरीकडे कारखान्यातील तडजोडीमुळे सत्यशील शेरकर मदतीसाठी येतील. त्याबरोबर शरद सोनवणेंची थोडीफार मदत होईल. पण या मतदारसंघात असणारे शिवसैनिक कोणीही मदत करणार नसल्याचे चित्र सध्या तरी दिसते. त्यामुळे अपक्ष लढण्याचे धाडसही ते करणार नाही. एकूणच ना घर का ना घाट का अशी अवस्था आढळराव पाटील यांची झाली आहे.