पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मूळचे बारामती तालुक्यातील काटेवाडीचे. त्यामुळे, त्यांचे बालपण हे गावातच आणि शेती-मातीच्या संस्कृतीचं गेले. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण करत असताना ते राजकारणात आले. पवार कुटुंबातच राजकारणाचा मोठा वारसा असल्याने, काका शरद पवार यांच्या तालमीतच त्यांनी राजकारणाचे डावपेच शिकण्यास सुरुवात केली. त्यातूनच, त्यांची कारकीर्द बहरली अन् आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार यांच्या मातोश्रींनी अजित पवार यांच्या राजकीय जडणघडणीचे श्रेय शरद पवार यांचे असल्याचे म्हटलयं.
“माझ्या मुलांना चांगले वळण लावत मी धाकासोबतच प्रेमाने वाढविले. आमचे सासर आणि माहेरचे कुटुंब मोठे असल्याने भरलेल्या गोकुळात माझे आयुष्य गेले. दिवाळीत आम्ही सगळे एकत्र येतो. शरद पवारांनी अजित पवारांना उभे केले. सुरुवातीला ग्रामपंचायत, कारखाना त्यानंतर बँक आणि आता प्रत्यक्ष राजकारणातील निवडणूक असा त्याचा प्रवास आहे”, असा उपमुख्यमंत्र्यांचा प्रवास सांगताना त्यांच्या मातोश्रींचा कंठ दाटला होता.
“शेतामध्ये माझे आयुष्य गेले. अजित पवार यांना स्वच्छतेची लहानपणापासून खूप आवड होती. वेळेत कामे करण्याची व चांगल्या कामासाठी न थांबण्याची त्याची प्रवृत्ती आहे. आपणही आपल्या मुलांना प्रेम, आपुलकीने वाढविले पाहिजे. तसेच मुलांच्या कलाप्रमाणे त्यांना वाढवावे. अजितदादा स्वभावाने प्रेमळ आहे आणि आज हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो”, असे आशा पवार यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर म्हटले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूस्, पुण्याच्या डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने तिसरा आदर्श माता पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंतराव पवार यांना बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या होत्या. या कार्यक्रमात बोलताना आशाताईंच्या डोळ्यात पाणी होते, तर मुखात पुत्र अजित पवार यांच्या जडणघडणीचा इतिहास होता.