Pune मेट्रोबाबत अजित पवार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत नाही? मुरलीधर मोहोळ यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 05:47 PM2021-12-21T17:47:25+5:302021-12-21T17:47:32+5:30
लकडी पुलावरील मेट्रोचं कामकाज अनेक दिवसांपासून रखडल्याने आज पुणे महापालिका सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला
पुणे : लकडी पुलावरील मेट्रोचं कामकाज अनेक दिवसांपासून रखडलं आहे. त्यावरुन आज पुणे महापालिका सभागृहात विरोधक गोंधळ घालतात. गणेश मंडळांच्या बाजूने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे यांनी कल दिला. ज्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. या सर्वप्रकाराबाबत महापौरांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय.
यावेळी मोहोळ म्हणाले, ''अजित पवारांनी पोलीस देखरेखीत पुणे मेट्रोचं काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबतीत स्पष्ट उल्लेख मेट्रोनं पुणे महापालिकेला दिलेल्या पत्रात केला आहे. जेव्हा लकडी पुलावरचं मेट्रोचं काम थांबवण्यात आलं त्यानंतर या कामावर आक्षेप घेणाऱ्या शहरातील गणेश मंडळांसोबत महापालिका प्रशासनाची बैठक झाली. गणपती मिरवणूक या पुलावरुन जाताना मेट्रोमुळे अडचण येईल म्हणून हे काम रोखण्यात आलं होतं. मात्र मेट्रोचं काम सुरु राहील, असं या बैठकीत ठरलं. तेव्हा गणेश मंडळं या निर्णयावर तयारही झाली होती. तरीही मेट्रोचं काम सुरु होऊ नये म्हणून गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी पुलावर जाऊन आंदोलनं केलीत. ज्यानंतर गणेश मंडळांनी मेट्रो कामाबाबतीत सुचवलेले पर्याय आणि मेट्रोची बाजू जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो पदाधिकाऱ्यांशी बैठकीत चर्चा केली. ज्यानंतर बैठकीत ठरलेल्या बाबींची माहिती मेट्रोकडून एक पत्र लिहून पुणे महापालिकेला देण्यात आलीये. एकीकडे उपमुख्यमंत्री मेट्रोचं काम सुरु करण्याचे आदेश देतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी महापालिका सभागृहात गोंधळ घालतात.''
मेट्रोच्या तांत्रिक विभागाकडून दोन पर्याय पुणे महापालिकेला सुचवले आहेत.
१. आता जर पुलाची उंची २१ फूटाहून ३० फूटापर्यंत न्यायची असेल. तर आता बांधकाम झालेले नदीपात्रातील १७ पिलर पाडावे लागतील. त्याला २७ कोटी अतिरिक्त खर्च येईल. हे काम पुन्हा व्हायला त्या वेळेपासून पुढे दिड वर्षाचा कालावधी लागेल.
२. जर या पुलाची उंची ४० फूट वाढवायची असेल, तर नदीपात्रातील एकुण ३८ पिलर पाडावे लागतील. ७९ कोटी त्यासाठी खर्च येईल. अधिकचे दोन वर्ष मेट्रोचं काम करायला लागतील.
मात्र, पुणे महापालिकेनं त्यानंतर मेट्रो अधिकारी आणि गणेश मंडळ यांच्याशी या पर्यायांवर चर्चा केली. हे पर्याय खर्च आणि वेळ यांबाबतील सुयोग्य नव्हते. त्यामुळे महापौरांनी मेट्रोच्या कामाला हरकत नसल्याचं स्पष्ट केलं.