बारामती शहरातील ‘गदीमा’ सभागृहात आयोजित ‘शारदोत्सव २०२३’ कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर हजेरी लावल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र, प्रकृती अस्वस्थ्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची या कार्यक्रमाला अनुपस्थिती होती.
भारतीय कला संस्कृतीला गावोगावी रसिकाश्रय लाभावा,या हेतूने खासदार सुप्रिया सुळे आणि उद्योजक श्रीनिवास पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गेल्या अनेक वर्षांपासुन दिवाळीनिमित्त पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने शारदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.यंदाच्या वर्षी शनिवारी (दि ११) ‘गदीमा’मध्ये प्रख्यात गायिका बेला शेंडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यानिमित्ताने शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील शारदोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली.उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते बेला शेंडे आणि कलाकारांना सन्मानित करण्यात आले.यावेेळी सुप्रिया सुळे आणि अजितदादा एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी बहीण भावांच्या नात्यांमधील संवाद बारामतीकरांना पाहायला मिळाला.बारामतीकर यावेळी सुखावल्याचे देखील पहावयास मिळाले.तसेच बारामतीकरांनी टाळ्यांचा कडकडाट करीत यावेळी दाद दिली.आजारपणामुळे दिवाळीत लोकांच्या गाठीभेटी घेणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं. परंतु, बारामतीतील शारदोत्सवाला अजित पवार यांनी अचानक हजेरी लावली.यावेळी मास्क घालून अजित पवार यांनी गाण्यांच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला.यावेळी पवार यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या.