पुणे : राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेला अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप ब्राह्मण समाजाने केला. राज्यात त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. पुण्यातही अमोल मिटकरी यांच्या विरोधात ब्राह्मण महासंघाने आंदोलन केले होते. तर राज्यात राजकीय नेत्यां कडूनही मिटकरी यांच्यावर टीका होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा अमोल मिटकरी यांच्यावर संतापून मत व्यक्त केले आहे. कुठल्याही समाजाबद्दल, घटकाबद्दल अवमान होणार नाही तसंच नाराजी वाढणार नाही याचं तारतम्य बाळगूनच वक्तव्यं केली पाहिजेत. असं पवार यावेळी म्हणाले आहेत.
पुण्यात बालगंधर्व नाट्यगृहात पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या 'राज्य शिखर प्रशिक्षण केंद्र' उद्घाटन आणि उत्कृष्ट नागरी बँकांच्या सत्कार समारंभासाठी ते आले होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पवार म्हणाले, राज्यात अनेक राजकीय नेते कुठल्याही प्रकारची विधान करतात. त्यानंतर तुम्ही मिडिया आणि इतर व्यक्ती या वक्तव्यावर तुमचं मत काय? असे प्रश्न विचारातात. तेव्हा मी नेहमी सांगतो की, कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अवमान होणार नाही. तसंच नाराजी वाढणार नाही याचं तारतम्य बाळगूनच वक्तव्यं केली पाहिजेत.
नागरी सहकारी बँकांबद्दल बोलताना पवार म्हणाले, स्पर्धेच्या युगात नागरी सहकारी बँकांसमोर अनेक अडचणी असल्या तरी ग्राहकांचा विश्वास मिळवीत प्रगती साधता येईल. सहकारी संस्था ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख व्हायला हव्यात. ग्राहकांना सेवा देताना व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. बँकांच्या प्रशासनात पारदर्शकता आणून अधिक चांगली सेवा देण्यावर भर द्यावा. नागरी सहकारी बँकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
काय म्हणाले होते मिटकरी
राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेला इस्लामपूरमध्ये सुरूवात झाली. त्यावेळी झालेल्या सभेत अमोल मिटकरी यांनी 'आम्हा बहुजनाच्या पोरांना काही समजू देत नाही, पण एका लग्नात गेलो होतो तिथे नवरदेव पीएचडी आणि नवरी एमए झालेली होती.त्यावेळी ब्राह्मणाने ’’ मम भार्या समर्पयामी’ असा एक मंत्र म्हटला. मी नवरदेवाच्या कानात त्याचा अर्थ सांगितला, अरे येड्या ते महाराज म्हणतायत ‘मम म्हणजे माझी. भार्या म्हणजे माझी बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा..आरारारा कधी सुधारणार? अशा प्रकारचे आक्षेपार्ह विधान ब्राह्मण समाजाबाबत केले होते.