चांगले 'DYSP' म्हणून तुम्हाला बारामतीत आणलं होतं...; अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 01:12 PM2021-11-15T13:12:04+5:302021-11-15T13:16:49+5:30
बारामती तालुक्यातील एका गावात सुरू असणाऱ्या अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलेने अजित पवार यांना निवेदन देऊन आपली व्यथा सांगितली...
बारामती (पुणे): उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे परिचित आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना ते खडे बोल सुनावणार यात शंका नाही. कामाच्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. मग तो पक्षाचा पदाधिकारी असो वा एखादा अधिकारी. याची प्रचिती रविवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी अनुभवली. बारामती तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी जाहीर सभेत DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याला धारेवर धरले.
बारामती तालुक्यातील एका गावात सुरू असणाऱ्या अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलेने अजित पवार यांना निवेदन देऊन आपली व्यथा सांगितली. माझा नवरा दारू पिऊन येतो, घरात लक्ष देत नाही, घराला घरपण राहिले नाही. त्यामुळे अवैध दारू विक्री बंद व्हावी अशा स्वरूपाचे निवेदन या महिलेने अजित पवारांना दिले होते.
हे निवेदन दाखवत अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भरसभेत धारेवर धरले. ते म्हणाले, 'DYSP इथे दारूबंदी व्हावी म्हणून मला निवेदन आले आहे. 2007 मध्ये दारूबंदी झाली होती. परंतु ती पुन्हा सुरू झाली. याचा त्रास येथील गोरगरीब महिलांना होत आहे. नेमकी अडचण काय आहे ? कायमची दारू बंदी करून टाका. जे कोणी असतील त्यांना टाडा लावा, काय लावायचे ते लावा पण कायमची दारूबंदी करून टाका. मी तुम्हाला चांगले DYSP म्हणून बारामतीत आणले होते. बारामतीच्या कुठल्याही भागात चालणारे दोन नंबरचे धंदे, बेकायदेशीर दारूविक्री, हातभट्टी कायमची बंद करा, जी कारवाई करायची असेल ती करा. असे सांगत अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. अजित पवारांच्या या स्पष्टवक्तेपणाची संपूर्ण ग्रामीण पोलीस दलात चर्चा सुरू आहे.