पुरस्कार महत्त्वाचा की मतदारांचा विश्वास हा विचार लोकसभा निवडणुकीत व्हावा- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 09:42 PM2024-05-05T21:42:41+5:302024-05-05T21:44:46+5:30
Ajit Pawar at Indapur Baramati: इंदापुरातील नगरपरिषदेच्या पटांगणात झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत अजितदादांनी विरोधकांचा घेतला खरपूस समाचार
Ajit Pawar at Indapur Baramati: शैलेश काटे, लोकमत न्यूज नेटवर्क, इंदापूर-प्रतिनिधी: पंतप्रधान गृहमंत्र्यावर टीका करुन काहींना संसदरत्न मिळेल मात्र बारामती लोकसभा मतदार संघाला एक रुपयाचा निधी मिळणार नाही. त्यामुळे संसदरत्न पुरस्कार महत्वाचा की ज्या मतदारांचा विश्वास महत्वाचा हा विचार लोकसभा निवडणुकीत व्हावा, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या इंदापूरात झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत आज (दि.५) केला. नगरपरिषदेच्या पटांगणात ही सभा झाली.
ते म्हणाले की, या सभेत सांगता सभा न म्हणता इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या शुभारंभाची सभा म्हणावी. त्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करुन लोकसभेत पाठवावे. गेल्या दहा वर्षात भिगवण व दौंड येथील रेल्वेसंदर्भातील प्रश्नांसंदर्भात बारामती लोकसभा मतदार संघातील बरेच प्रश्न मार्गी लागू शकले नाहीत. आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून राजकारण करतो.नकारात्मक दृष्टीने केलेले राजकारण फार काळ टिकत नाही.
विरोधकांनी केलेल्या आरोपांना समर्पक उत्तर देण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो. पाण्याचा प्रश्न सोडवणे,कालव्यातून तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचावे, बंधा-यांची कामे करावीत असे नियोजन करण्यात येत आहे, असे पवार म्हणाले. विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व आपण निधी देवूच. या खेरीज केंद्रातून ही निधी आणायचा आहे. त्यासाठी केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून जाणे लोकसभा मतदार संघातील तालुक्यांसाठी महत्वाचे आहे. विकासावर मत दिले नाही तर तुमची माझी पुढची पिढी जाब विचारल्याशिवाय रहाणार नाही, असे ही त्यांनी सांगितले.
सत्तर हजार कोटी रुपयांच्या कथित गैरकारभाराबाबतच्या आरोपांविषयी बोलताना ते म्हणाले की, मागेच बहुतेक शासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच एसीबीची क्लिनचीट मिळाली होती. देवेंद्र फडणवीस असताना ही क्लिनचीट मिळाली होती. या वेळी आ. दत्तात्रय भरणे, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर व इतरांची भाषणे झाली.
मी दम देत नाही, माझा फक्त आवाज चढतो!
मी कधी कोणाला दमदाटी करत नाही. सर्वसामान्यांसाठी आवश्यक असणारे काम अधिका-यांना अनेकदा सांगून होत नसेल तर मी दम देत नाही फक्त माझा आवाज चढतो.पण माझा आवाजच असा आहे त्याला मी काय करणार. शेवटी मला मिळालेली ती देणगी आहे.
-अजित पवार