पुणे : पुण्यातील आठ जागांपैकी चार जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे असणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. पुण्यातील अण्णाभाऊ साठे रंगमंदिरात आयाेजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांनी ही घाेषणा केली. यावेळी खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अंकुश काकडे, शहराध्यक्ष चेतन तुपे आदी उपस्तिथ होते.
निवडणुकांच्या ताराखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी तर्फे आज पुण्यात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पवार म्हणाले, आघाडीमध्ये पुण्यातील चार जागा राष्ट्रवादी लढविणार आहे. त्यात पर्वती, वडगावशेरी, हडपसर आणि खडकवासल्याच्या जागेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. तसेच इतर 3 जागांवर काॅंग्रेस निवडणुक लढविणार असून एक जागा मित्र पक्षाला साेडण्यात येणार आहे. बऱ्याच नव्या चेहऱ्यांना यंदा उमेदवारी देणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच जे गेले जे गेले त्यांना महत्व देण्याची गरज नाही. जुने गेल्यामुळे नवीन लोकांना संधी मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच केवळ राष्ट्रवादीच्याच नाहीतर आघाडीच्या प्रत्येक उमेदवारासाठी काम करण्याचा सल्ला देखी पवारांनी यावेळी दिला.
निवडणुकीला सगळे गटतट विसरुन सामारे जा असे म्हणत, निगेटिव्ह बाेलू नका नाहीतर निवडणुकीपर्यंत आजाेळी जाऊन रहा असे म्हणत पवारांनी कार्यकर्त्यांचे कान देखील टाेचले. तसेच आघाडीचेच सरकार येणार हा विश्वास देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.